
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर खून प्रकरणाचा तब्बल 20 वर्षांनंतर धक्कादायक निकाल आला आहे. माफीच्या साक्षीदाराने वारंवार आपली साक्ष फिरवल्याने ती ग्राह्य धरता येत नसल्याचे स्पष्ट नमूद करत मुंबई सत्र न्यायालयाचे न्या. सत्यनारायण नावंदर यांनी या प्रकरणातील माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. न्यायाधीशांनी या साक्षीदाराला फितूर घोषित केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पवनराजे निंबाळकर यांचा खून कोणी आणि कशासाठी केला हे प्रश्न मात्र अनुत्तरित राहिले आहेत.
धाराशीव येथील तत्कालीन काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हे 3 जून 2006 रोजी मुंबईला कामानिमित्त आले होते. काम आटोपून पुण्याकडे जात असतानाच अचानक त्यांना जमिनीच्या व्यवहारासाठी फोन आला. फोनवरील व्यक्तीने त्यांना व्यवहाराची बोलणी करण्यासाठी कळंबोली परिसरात बोलावले. पवन निंबाळकर आणि चालक समद काझी हे कळंबोलीकडे जात असतानाच अचानक एक इंडिका कार समोर आडवी आली. त्यातील दोघांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात पवन निंबाळकर आणि समद काझी हे दोघेही जागेवरच ठार झाले. या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे तपास आला. तपास योग्य होत नसल्यामुळे निंबाळकर कुटुंबाने 2007 मध्ये उच्च न्यायालयात तक्रार करून तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली. 2008 मध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार हा तपास सीबीआयकडे देण्यात आला.
डॉ. पद्मसिंह पाटलांसह नऊ जणांवर आरोप
सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून नऊ जणांना दोषी ठरवत 5000 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. यामध्ये माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, शशिकांत कुलकर्णी, कैलास यादव, दिनेश तिवारी, पिंटू सिंह, छोटे पांडे आणि पारसमल जैन यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले. यापैकी पारसमल जैन हा माफीचा साक्षीदार झाला होता.
श्रीमंत जैन 50 हजारांची सुपारी कशाला घेईल?
माफीचा साक्षीदार पारसमल जैनकडे चांगली मालमत्ता आहे. सोने आहे. त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. असे असताना स्वतःच्या वैद्यकीय खर्चाकरिता त्याने 50 हजारांसाठी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी घेतली असावी हे विश्वसनीय नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
अण्णा हजारे यांच्यासह 128 जणांची साक्ष
तब्बल 19 वर्षे या खटल्याची सुनावणी चालली. न्यायालयासमोर 128 जणांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचाही समावेश होता. निंबाळकर आणि पाटील यांच्यात राजकीय वैमनस्य होते. मात्र, त्या आधारावर शिक्षा ठोठावता येणार नाही. त्यासाठी ठोस पुराव्यांची आवश्यकता असते, असे गंभीर निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सीबीआयला चपराक दिली.
कारचा पुरावा विश्वासार्ह नाही
हत्येसाठी वापरलेली कार व जप्त केलेली गाडी एकच आहे हे सिद्ध झाले नाही. कार पूर्णपणे जळाली होती. तरीदेखील कारचा रंग पंचनाम्यात हिरवा नमूद आहे. कार नेमकी कुठे सापडली यातही तफावत आहे. घराजवळ कार सापडली असे एका साक्षीदाराने सांगितले, तर बंगल्याजवळ कार सापडली असे दुसऱया साक्षीदाराचे म्हणणे आहे. कार ओपन प्लॉटवर सापडली, अशी पोलीस दफ्तरी नोंद आहे. त्यामुळे या कारचा पुरावा विश्वासार्ह नाही, असे म्हणत न्यायालयाने सीबीआयचे कान टोचले.
सीबीआयने योग्य तपास केला नाही
2002च्या निवडणुकीनंतर पाटील व निंबाळकर यांच्यातील वैर वाढत गेले. पद्मसिंह पाटील यांच्यापासून जिवाला धोका असल्याचे पत्र निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी यांना 2003 मध्ये दिले होते. या पत्राचा योग्य तपास सीबीआयने केला नाही. असे खडे बोल न्यायालयाने सीबीआयला सुनावले.
- 17 वर्षांनंतर न्याय मिळाला. मात्र ही 17 वर्षं सहन करावे लागले. कुठलाही संबंध नसताना पद्मसिंह पाटलांनी हे सहन केले. जे षड्यंत्र रचले गेले ते समोर आले. नेमकी हत्या कोणी केली याचा योग्य तपास झाला पाहिजे. मुख्य आरोपी कोण हे कळले पाहिजे. – राणा जगीतसिंह पाटील
जैनच्या साक्षीत दोष
पारसमल जैन माफीचा साक्षीदार असला तरी त्याची साक्ष वारंवार बदलत गेली आहे. त्यावर भरवसा ठेवता येणार नाही. घटनेआधी जैनने निंबाळकरांना फोन करून बोलावल्याचाही पुरावा सादर झालेला नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
ओम निंबाळकर आता काय करणार?
या खटल्याच्या निकालानंतर खासदार ओम निंबाळकर काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाचा निकाल हा दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. या निकालाविरोधात हायकोर्टात दाद मागणार आणि तिथेही निकाल नाही मिळाला तर पुढे सुप्रीम कोर्टात जाऊ, असे निंबाळकर म्हणाले.
आपल्या राजकीय भूमिकेवर ते म्हणाले की, मी अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जाऊन जनतेशी चर्चा केल्यानंतर माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन. माझा राजकीय निर्णय काहीही असला तरी मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात कधीही बोललो नाही आणि कधीही बोलणार नाही, असे ओम निंबाळकर म्हणाले.




























































