
>> दुष्यंत पाटील, [email protected]
युद्धाच्या काळात अस्थिर झालेल्या समाजाचे प्रतिबिंब उमटलेले चित्र म्हणजे ‘ला तूर’ या चित्रकाराने चितारलेले ‘द फॉर्च्यून टेलर’ हे चित्र.
1618 ते 1648 हा काळ युरोपमध्ये तीस वर्षांच्या युद्धाचा काळ म्हणून ओळखला जातो. इतिहासात हा काळ अतिशय संघर्षाचा काळ म्हणून ओळखला जातो. या काळात संपूर्ण युरोप धार्मिक आणि राजकीय कारणांमुळे एकमेकांच्या रक्ताचा तहानलेला होता. बऱ्याच ठिकाणी उपासमार, साथीचे रोग, प्लेग आणि सैनिकांची लूटमार रोजची झाली होती.
अशा अस्थिर काळात समाजात एक वेगळेच वातावरण तयार होतं. अशा वेळी लोकांना उद्या काय होईल? हा प्रश्न सतत भेडसावत असतो, पण या प्रश्नाचं उत्तर कुणीच देऊ शकत नाही. मग अशा वेळी लोक ज्योतिष्यांकडे, भविष्य सांगणाऱ्यांकडे धाव घेतात. त्या काळात युरोपमध्ये ‘जिप्सी’ किंवा ज्यांना तिथे ‘बोहेमियन्स’ म्हटले जायचे, अशा भटक्या जमाती फिरत असत. हे लोक भविष्य सांगणं, जादूचे खेळ दाखवणं आणि हातावरील रेषा वाचणं यात पटाईत मानले जायचे. एकीकडे लोकांना त्यांच्याबद्दल प्रचंड कुतूहल होते, तर दुसरीकडे त्यांच्याबद्दल भीती आणि अविश्वास होता. लोकांना वाटायचं की, हे लोक जादूटोणा करायचे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे लोक अत्यंत सराईत खिसेकापू आणि चोर असतात. तरुण मुलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना भविष्याचे खोटे स्वप्न दाखवून त्यांचे खिसे रिकामे करणं हा या लोकांचा मुख्य धंदा आहे, असा एक समज समाजात दृढ होता. सतराव्या शतकातल्या ‘ला तूर’ नावाच्या चित्रकारानं हे सगळं जवळून पाहिलं. ला तूरनं याच विषयावर एक ‘द फॉर्च्यून टेलर’ नावाचं एक चित्र काढलं.
चित्राच्या मध्यभागी आपल्याला एक देखणा तरुण दिसतो. त्याचा चेहरा पूर्ण प्रकाशात चमकतोय. त्याचे डोळे त्याचं भविष्य सांगणाऱ्या म्हातारीच्या चेहऱ्याकडे रोखलेले आहेत. त्याच्या चेहऱ्यावर एक संशयाचा, पण त्याच वेळी कुतूहलाचा भाव आहे. तो स्वतला खूप हुशार समजतोय, पण त्याला माहीत नाही की, तो एका मोठय़ा जाळ्यात अडकला आहे. त्याचा डावा हात उजवीकडे असणारी म्हातारी पाहतेय, पण त्याच वेळी डावीकडून दुसरी मुलगी सराईतपणे त्या तरुणाच्या खिशातून सोन्याचे पाकीट सरकवून बाहेर काढत आहे! तिची बोटे एखाद्या कसलेल्या जादूगारासारखी हलत आहेत. तरुणाच्या उजव्या बाजूला एक मुलगी उभी आहे. तीही चोरीचा प्रयत्न करताना दिसतेय. तिचे हात त्या तरुणाच्या अंगावर असलेल्या सोन्याच्या साखळीला एका धारदार चाकूनं कापण्याचा प्रयत्न करत आहेत! सर्वात उजवीकडे आपल्याला वृद्ध स्त्री दिसते. तिचा चेहरा काळा आणि सुरकुतलेला आहे. ती त्या तरुणाला आपल्या बोलण्याच्या जाळ्यात गुंतवून ठेवत आहे.
चित्रकारानं या चित्रात गुन्हेगारीचं मानसशास्त्र दाखवलंय. चित्रातल्या तरुणानं अतिशय महागडे, चकचकीत आणि नक्षीदार कपडे घातले आहेत. त्याच्या गळ्यातील पांढरी कॉलर त्या काळातील श्रीमंतीचं आणि उच्चभ्रू असण्याचं प्रतीक होतं. त्याचा उभा राहण्याचा अंदाज दाखवतो की, तो अत्यंत गर्विष्ठ आहे. त्याला वाटतं की, बाजारातले हलक्या दर्जाचे लोक आपलं काहीच करू शकत नाहीत ! चित्रातल्या तरुणाचे डोळे म्हातारीकडे आहेत, पण त्याची संपत्ती इतर मुलींच्या ताब्यात आहे. ला तूरला दाखवायचं होतं की, जेव्हा एखादा तरुण मुलगा अंधश्रद्धेच्या आहारी जातो किंवा सुंदर मुलींच्या रूपासमोर आणि गोड बोलण्यासमोर स्वतचं भान हरवून बसतो तेव्हा त्याचं काय नुकसान होतं! हे चित्र म्हणजे एका अर्थानं ‘सावधान! फसवणूक होऊ शकते’ असा बोर्ड लावणारं चित्र आहे.
हे चित्र आज अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात असलेल्या जगातील सर्वात मोठय़ा आणि प्रतिष्ठित संग्रहालयांपैकी एक असणाऱ्या ‘द मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’मध्ये अत्यंत सुरक्षितपणे जतन करून ठेवलंय. 1960 च्या दशकात या म्युझियमनं हे चित्र एका खासगी संग्राहकाकडून प्रचंड मोठी किंमत मोजून विकत घेतलं होतं. जेव्हा हे चित्र अमेरिकेनं विकत घेतलं तेव्हा फ्रान्समध्ये मोठा गदारोळ झाला होता. फ्रेंच लोकांना वाटत होतं की, त्यांच्या देशाचा हा अमूल्य ठेवा त्यांच्याच देशात (उदा. लूव्र म्युझियममध्ये) राहायला हवा होता.
हे चित्र पाहताना आपल्या चेहऱ्यावर सुरुवातीला एक हसू येतं, पण नंतर आपण अंतर्मुखही होतो. चारशे वर्षे झाली असली तरी आजही माणसं अशाच प्रकारे फसताना दिसतात.




























































