
इस्माईल सायबारीने सामन्याच्या अवघ्या 71व्या सेकंदाला केलेल्या गोलच्या जोरावर मोरोक्कोने स्कॉटलंडचा 1-0 असा पराभव केला. सलग दुसऱ्या सामन्यात गोल करणाऱ्या सायबारीच्या चमकदार कामगिरीमुळे उत्तर आफ्रिकेतील हा संघ बाद फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकण्यात यशस्वी ठरला.
पहिल्या सामन्यात बलाढय़ ब्राझिलला 1-1 अशा बरोबरीत रोखणाऱ्या मोरोक्कोने या विजयासह चार गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे ‘सी’ गटामध्ये त्यांची स्थिती अधिक मजबूत झाली आहे. सामना सुरू झाल्यानंतर स्कॉटलंडची बचावफळी अजून सावरत असतानाच ब्राहिम डायाझच्या अचूक पासवर इस्माईल सायबारीने वेगाने धाव घेत चेंडूवर ताबा मिळवला. त्यानंतर त्याने गोलरक्षक अँगस गनला कोणतीही संधी न देता चेंडू जाळ्यात धाडला. अवघ्या 71 सेकंदांत झालेला हा गोल विश्वचषकातील सर्वात जलद गोलांपैकी एक ठरला.
सुरुवातीच्या गोलनंतर मोरोक्कोने संपूर्ण पहिल्या सत्रात वर्चस्व राखले. वेगवान आक्रमण, अचूक पासिंग आणि शिस्तबद्ध बचावाच्या जोरावर त्यांनी स्कॉटलंडला फारशा संधी दिल्या नाहीत. स्कॉटिश संघाने पुनरागमनासाठी प्रयत्न केले; मात्र मोरोक्कोच्या भक्कम बचावापुढे त्यांना यश मिळाले नाही.





























































