नवलच! ‘जंतर-मंतर!’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण

सूर्य ‘न चालता’ चालतो कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून. याशिवाय पृथ्वीचा अक्ष साडेतेवीस अंशांनी कललेला असल्याने, आपल्याला ऋतुचक्राचा अनुभव येतो. त्यात दिवस ‘लहान’ किंवा ‘मोठा’ झाल्याचं आपल्याला जाणवतं. हिवाळय़ात सूर्य पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धावर जास्त वेळ तळपतो. त्यावेळी विषुववृत्ताच्या दक्षिणेचा दिवस ‘मोठा’ असतो. आज 21 जूनला सूर्य साधारण उज्जैन (उज्जयिनी) शहरावर तळपत असेल. सूर्याच्या उत्तरायणाची ‘मर्यादा’ आज संपेल. उद्यापासून त्याचं ‘दक्षिणायन’ सुरू होईल ते 21 डिसेंबरला थांबेल. त्यावेळी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांमध्ये उन्हाळा व आपल्याकडे थंडी असेल.

पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या लंबगोलाकार कक्षेमुळे ती कधी सूर्याच्या जवळ येते तर कधी दूर जाते. सध्याचा काळ पृथ्वी सूर्याच्या अधिकाधिक जवळ असण्याचा. येत्या चार जुलै रोजी पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ म्हणजे ‘उपसूर्य’स्थानी असेल. सूर्याचे ‘दक्षिणायन’ मात्र त्याआधीच सुरू होईल. गेल्या तीनेकशे वर्षांचा इतिहास पाहिला तर देशातील राजेशाहीच्या काळात जयपूरचे राजे सवाई जयसिंग (दुसरे) यांचा काळ 1688 ते 1743 असा होता. अवघं 55 वर्षांचं जीवन लाभलेल्या या राजाने जयपूर शहराला भक्कम तटबंदी केली. जयपूरजवळच्या अंबर (आमेर) किल्ल्यावरून त्यांचं राज्य चालायचं. त्यांनी जयपूर शहर तर वसवलेच, पण खगोलशास्त्रात विलक्षण रस घेतला. आपल्या लोकांना प्राचीन गणिती आणि खगोलीय परंपरा समजली पाहिजे, असा त्यांचा ध्यास होता.

त्यांचे गुरू जगन्नाथ सम्राट यांच्या शिकवणुकीनुसार युद्ध आणि आक्रमणांच्या धकाधकीच्या काळातही त्यांनी देशात विविध ठिकाणी पाच वेधशाळा बांधल्या. त्यांना ‘जंतर मंतर’ म्हणतात. जंतर म्हणजे जग किंवा यंत्र आणि मंतर म्हणजे ‘मंत्र’ अथवा विचार. दिल्ली, मथुरा, काशी, उज्जैन आणि अर्थातच राजधानी जयपूर येथे भव्य ‘जंतर मंतर’ उभारून सवाई जयसिंग (दुसरे) यांनी प्राचीन हिंदुस्थानी वैज्ञानिक प्रगतीचं मूर्त स्वरूप उभारलं. उज्जैन शहर बरोबर कर्क वृत्तावर असल्याचं त्यांना ठाऊक होतं. त्यामुळे उज्जैनवर येणारा 21 जूनचा सूर्य तो दिवस ‘मोठा’ आहे हे दाखवतो त्यावेळी प्राचीन हिंदुस्थानी खगोल गणिती अभ्यासाचं दर्शन घडवणारं ‘जंतरमंतर’सुद्धा तिथे आहे याची आठवण करून देतो. ‘कर्क वृत्त’ दाखवणारी एक छोटी भिंतही तिथे होती असं ऐकलं होतं, पण त्याला पुरावा सापडत नाही. या ‘मोठय़ा’ दिवशी सवाई जयसिंग या नवलकथेचं स्मरण जरूर करावं.