
>> डॉ. समिरा गुजर-जोशी
स्वच्छदं सरसीषु सञ्चरतरां स्वच्छश्च बोभूहि भो। मुक्ताशुक्तिषु च प्रपञ्चयतरां चञ्चू समुञ्चञ्चनाम् ।
एकं मा कुरु मा कुरु प्रिय सख प्रह्वन्तु कह्व ब्रुवे। नीरक्षीरविवेचनैकचतुरैर्हंसैस्तु यत्स्पर्द्धसे ।।
हे बगळ्या, तू सरोवरांत स्वच्छंदपणे विहार कर, आपल्या शुभ्रतेचा अभिमान बाळग, शिंपल्यांमधील मोत्यांचा आस्वाद घेण्यासाठी आपली चोच अधिकाधिक पुढे कर; पण एक गोष्ट मात्र करू नकोस. प्रिय मित्रा, मी तुला विनंतीपूर्वक सांगतो की, जे हंस नीर-क्षीर-विवेक या अद्वितीय गुणामुळे प्रसिद्ध आहेत, त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न मात्र करू नकोस.
हा श्लोक अशा व्यक्तींवर बोट ठेवतो की ज्या बाह्य साम्य किंवा दिखाऊ गुणांच्या जोरावर खऱ्या गुणवंतांशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करतात. फक्त शुभ्र रंग असल्याने हंस होता येत नाही; त्यासाठी विवेकही हवा.




























































