
तृणमूल काँग्रेस पक्षाची तब्बल ४४० कोटी रुपये जमा असलेली तीन बँक खाती गोठवण्यात आली आहे. विधाननगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे आता या खात्यांमधून पक्षाला कोणतेही पैसे काढता येणार नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, रितब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील १० बंडखोर आमदारांनी पोलिसांत यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. या बँक खात्यांमध्ये जमा असलेला पैसा बेकायदेशीर मार्गाने, घोटाळ्यांमधून किंवा चुकीच्या पद्धतीने गोळा करण्यात आला असल्याचा संशय या आमदारांनी व्यक्त केला आहे.
बंडखोर आमदारांच्या याच तक्रारीची दखल घेत पोलिसांनी या खात्यांवर डेबिट फ्रीज लावला आहे, ज्यामुळे त्यातून पैसे काढण्यावर निर्बंध आले आहेत. सध्या पोलीस या पैशांचा नेमका स्रोत काय आहे आणि ही रक्कम खात्यांमध्ये कुठून आली, याचा तपास करत आहेत.

























































