
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नुकत्याच झालेल्या भेटीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “पंतप्रधानांनी अमेरिकेसमोर अशी शरणागती पत्करलेली देशाने यापूर्वी कधीच पाहिली नाही. या भेटीने हिंदुस्थानींची मान शरमेने खाली झुकली आहे,” अशी टीका काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत केली. तसेच तीन हिंदुस्थानी खलाशांच्या झालेल्या हत्येवर अमेरिकेने कोणतीही खंत व्यक्त न केल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
काय म्हणाले पवन खेरा?
या भेटीतील पंतप्रधानांच्या देहबोलीवर निशाणा साधताना पवन खेरा म्हणाले की, “या आठवड्यात संपूर्ण जगाने एक अत्यंत लाजिरवाणा प्रकार पाहिला. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर पंतप्रधान मोदींच्या नजरा खाली होत्या, त्यांचे हात थरथरत होते आणि ते सोफ्यावर एका कोपऱ्यात आखडून बसले होते. हा संवाद १५० कोटी जनतेच्या प्रतिनिधीचा एखाद्या देशाच्या प्रमुखासोबत असल्यासारखा वाटत नव्हता, तर एखाद्या कंपनीचा एजंट आपल्या मालकाशी बोलत असल्यासारखा वाटत होता.”
पंतप्रधान मोदी हातातल्या चिठ्ठीतून वाचून वारंवार ट्रम्प यांना एक्सेलन्सी म्हणत होते, यावरही खेरा यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, “खुद्द अमेरिकन दुभाषिकालाही याची लाज वाटली आणि त्याने भाषांतर करताना एक्सेलन्सी ऐवजी मिस्टर प्रेसिडेंट असाच प्रमाणित उल्लेख केला.” चिठ्ठी वाचून बोलण्याच्या या शैलीवरून खेरा यांनी मोदींची खिल्ली उडवत त्यांना स्लिप्स पीएम असे संबोधले.
काँग्रेस नेत्यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग या माजी पंतप्रधानांची आठवण करून दिली. “हा एक स्वतंत्र देश आहे. हिंदुस्थानच्या कोणत्याही पंतप्रधानांनी याआधी कधीही कोणासमोर अशी मान झुकवलेली किंवा अशी तडजोड स्वीकारलेली आपण पाहिलेली नाही,” असे खेरा म्हणाले.





























































