
छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलिकनगर भागातील महारुद्र हनुमान मंदिराजवळ शनिवारी (20 जून) पहाटे एक धक्कादायक घटना घडली. येथील एका दुमजली इमारतीमध्ये अचानक घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे.
पुंडलिकनगर मधील महारुद्र हनुमान मंदिराजवळ रस्त्यावरच दुमजली इमारत असून या इमारतीत खाली दुकाने व वरती निवासी घरे आहेत. दुकानाच्या पाठिमागे देखील खोल्या काढून भाड्याने देण्यात आल्या आहेत. शनिवारी 20 जून रोजी पहाटे साडे चार वाजता एका दुकानाला आग लागली आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. क्षणार्धात पाठिमागे खोलीत ठेवण्यात आलेल्या चार सिलिंडरमधील एका सिलिंडरला गळती लागून स्फोट झाला. गॅस सिलिंडरच्या स्फोटाने पुंडलिकनगर हादरले. अनेकांच्या घरांना हादरे बसले. पाठिमागच्या खोलीत राहणा-या सुनंदा राजेंद्र मोरे (45) या महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन तातडीने घरातील 9 व्यक्तींना सुखरूप बाहेर काढले. मृत महिलेला घाटी रूग्णालयात नेण्यात आले आहे.
यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारीअशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी विनायक कदम, संजय कुलकर्णी, छत्रपती केकान, संदीप चव्हाण,अग्निशामक जवान अशोक वेलदोडे, बाबासाहेब ताठे,अक्षय नागरे, सचिन शिंदे, मतीन शेख, विलास झरे, माधव गाडे,वाहन चालक चंदनशिव,गव्हाड, नंदू घुगे यांनी परिश्रम घेतले.






























































