
मुरबाड-माळशेज मार्गावर असलेल्या सायले गावात सध्या दगड-मातीमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. येथील अख्खी टेकडी उद्ध्वस्त करण्याचे काम सध्या सुरू असल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार आहे. क्रशिंगचा होणारा आवाज, धूळ यामुळे प्रदूषण वाढणार आहे. या भागात कोणत्याही प्रकारच्या क्रशिंगला परवानगी देण्यात येऊ नये, असा ठराव सायले ग्रामपंचायतीने केला होता. पण हा ठराव माफियांनी केराच्या टोपलीत टाकला आहे. बेकायदा उत्खननामुळे सायले गावासह पारगाव, किसळ व जवळील परिसर भकास होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
मुरबाड हा भातशेती करणारा तालुका म्हणून प्रामुख्याने ओळखला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून धनदांडग्यांनी येथील कसत्या जमिनी कवडीमोल भावाने घेतल्या आणि त्यावर बंगले तसेच रो हाऊसेस उभारले. जेमतेम बाराशेची वस्ती असलेले सायले हे गाव सध्या गाजत आहे ते येथील बेकायदा सुरू असलेल्या दगड-माती उत्खननामुळे. साकेत इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने सध्या गावातील संपूर्ण टेकडीच पोखरण्याचे काम सुरू आहे. या कंपनीला कुणी परवागनी दिली तसेच कुणाचा राजकीय वरदहस्त आहे काय, असा थेट सवाल ग्रामस्थ करत आहेत.
स्टोन क्रशिंगमुळे सायले गावाच्या परिसरात प्रदूषण होणार असून तेथे येणाऱ्या अवजड वाहनांमुळे गावातील नागरिकांना सुरक्षित रस्ते मिळणार नाहीत. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी विरोध करून तसा ठराव जिल्हाधिर्काऱ्यांना सादर केला.
जागृती पानसरे (सरपंच)
धोकादायक क्रशिंगला सर्व ग्रामस्थांनी विरोध केला असल्याचा ठराव ग्रामसभेत आधीच मंजूर झाला आहे. तो तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे.
अशोक बांगर, (ग्रामपंचायत अधिकारी)
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना त्रास
सायले गावात खडी, क्रशिंग बसवणे, जमीन अकृषिक करणे, माती-मुरूम-दगड याचे उत्खनन तसेच वाहतूक अशा कोणत्याही कामाला परवानगी देण्यात येऊ नये, असा ठराव २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला होता. सायले ग्रामपंचायतीने या ठरावाच्या प्रतिसह मुरबाडचे तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र पाठवले. तरीदेखील साकेत इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीच्या वतीने बेकायदा रेती-माती उत्खनन सुरूच आहे. स्टोन क्रशिंगच्या प्रचंड आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, शाळेतील विद्यार्थी, रुग्ण यांना त्रास सहन करावा लागत आहे.




























































