
तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी शुक्रवारी संसदेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये (NCPI) सामील झालेल्या २० बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला त्यांनी अध्यक्षांसमोर आव्हान दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि सौगत रॉय हेदेखील उपस्थित होते. पक्ष एकसंध असल्याचे सांगत त्यांनी बंडखोर गटाचे दावे फेटाळून लावले. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
लोकसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, १४ जून रोजी त्यांनी अध्यक्षांना एक पत्र दिले होते. त्या आधारावर त्यांना बोलावण्यात आले होते, परंतु तेव्हा ईडीची चौकशी सुरू असल्याने ते येऊ शकले नव्हते. आज संध्याकाळी ५ वाजता ही भेट झाली. या बैठकीपूर्वी महुआ मोईत्रा यांनीही पक्षाच्या वतीने लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली होती.
अभिषेक बॅनर्जी यांनी अध्यक्षांकडे तक्रार करत म्हणाले की, संविधानाच्या दहाव्या अनुसूचीनुसार, जर कोणी स्वेच्छेने पक्ष सोडत असेल तर त्याचे सदस्यत्व रद्द होते. या २० खासदारांनी दुसरा पक्ष जॉईन केल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द व्हायला हवे. बंडखोर गटाचा दोन तृतीयांश विलीनीकरणाचा दावा चुकीचा आहे. केवळ विधिमंडळ पक्ष दुसऱ्या पक्षात गेल्याने विलीनीकरण होत नाही. त्यासाठी संपूर्ण पक्ष संघटनेचे विलीनीकरण होणे आवश्यक असते. केवळ खासदार गेल्यास सदस्यत्व रद्द होते.
बॅनर्जी यांनी २० वेगवेगळ्या अपात्रता याचिका दाखल केल्या असून, त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा याचिकांवर ३ महिन्यांत निर्णय व्हायला हवा. बंडखोर खासदारांचे स्वतंत्र गट बनवण्याचे किंवा बसण्याची जागा वेगळी देण्याचे दावे नंतरचे आहेत, आधी त्यांची खासदारकी रद्द करा. त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीत ज्या पक्षाच्या तिकिटावर लढायचे आहे त्यावरून लढून यावे, असे आव्हानही त्यांनी दिले.




























































