
छत्तीसगढमधील कोरिया जिल्ह्यात कौटुंबिक हिंसेची आणि क्रूरतेची एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. पतीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्याच पत्नीचे हात-पाय बांधून तिला बेदम मारहाण केली. तिचे मुंडन करून चेहऱ्याला इंजिन ऑइल फासले. एवढ्यावरच न थांबता पतीने मुलांसमोरच तिला सक्तीने स्वतःचे मूत्र पिण्यास भाग पाडले. अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्ह्या दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, तक्रारदार महिला ‘तारा’ आणि आरोपी जितेंद्र घसिया यांचा 15 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. त्यांना चार मुले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात सतत वाद होत होते. जितेंद्र बायकोवर सतत संशय घ्यायचा आणि हुंड्यासाठी तिचा छळ करायचा. पतीच्या रोजच्या त्रासाला आणि मारहाणीला कंटाळून ती मुलांसह वेगळी राहत होती. घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती.
दरम्यान, 14 जून रोजी आरोपी जितेंद्रने पत्नी राहत असलेल्या ठिकाणाचा शोध घेतला. तो तिथे गेला आणि त्याने पत्नी ताराला घराबाहेर बोलावून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिला दोरीने बांधून क्रूरपणे मारहाण केली. पतीने माझे केस कापले आणि चेहऱ्याला काजळी व इंजिन ऑइल लावून विद्रूप केले. एवढेच नाही तर मला जिवंत जाळण्याची धमकी देत त्याने त्याचे मूत्र पिण्यास भाग पाडले, असे पीडितेने पोलिसांना सांगितले.
मुलांनाही केले गुन्ह्यात सामील
या संपूर्ण घटनेदरम्यान तिची मुले भीतीने थरथर कापत होती. आरोपीने अमानुषतेची सीमा ओलांडत मुलांनाही या कृत्यात ओढले. त्याने मुलांना त्यांच्या आईच्या कानशिलात लगावण्यास सांगितले आणि एका मुलाला जबरदस्तीने आईला मूत्र पाजण्यास प्रवृत्त केले.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई
सुरुवातीला पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 85, 115(2) (इच्छेविरुद्ध दुखापत करणे), 296 (अश्लील कृत्य आणि शिवीगाळ) आणि 351(2) (धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी अधिक वेगाने तपास सुरू केला. आरोपीला लवकरच न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीत पाठवले जाईल, असे त्यांनी सांगितले.





























































