
राम मंदिरात देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर एफआयआर दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी संजय सिंह यांनी जन्मभूमी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली असून राम मंदिर फंडाचा गैरवापर आणि आर्थिक अनियमिततेची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
या घोटाळ्याशी संबंधित सर्व नावे, तथ्ये आणि भक्कम पुरावे समोर आले असल्याचा दावा संजय सिंह यांनी केला आहे. सीसीटीव्ही फुटेज, संशयितांचे जबाब आणि चोरीला गेलेला ऐवज जप्त करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. मात्र एवढे भक्कम पुरावे हाती असूनही चंपत राय, अनिल मिश्रा, गोपाल आणि टिन्नू यांसारख्या व्यक्तींना प्रशासनाने अद्याप अटक करून तुरुंगात का पाठवले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
लखनौ येथे गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सिंह यांनी भाजप सरकार आणि त्यांच्या तपास यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल केला. सध्या देशात एक ईडी पार्टी काम करत असून विरोधकांच्या छोट्या-मोठ्या प्रकरणांमध्ये तत्परतेने ईडी आणि सीबीआयची कारवाई केली जाते. मात्र प्रभू श्रीरामाच्या दानपेटीतून झालेल्या शेकडो कोटींच्या चोरीवर या केंद्रीय तपास यंत्रणांनी सोयीस्कर मौन बाळगले असल्याचा आरोप त्यांनी केला.
याशिवाय, २०२० ते २०२४ या काळात जेव्हा जमीन खरेदी आणि देणगीत हा कथित घोटाळा सुरू होता, तेव्हा प्रशासकीय समन्वयासाठी नेमण्यात आलेले पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय ज्ञानेश कुमार हे ट्रस्टचे सदस्य होते. सुरळीत कामकाज पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर असताना ते देखील या गैरव्यवहारात सहभागी असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. ईडी पार्टीने यात नेमके किती पैसे लुटले, याचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही संजय सिंह यांनी केली आहे.





























































