
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळा प्रकरणावर राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष आणि माजी आयएएस अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांनी मोठे विधान केले आहे. भाविकांसोबत विश्वासघात झाला असून देणगीवर उघडपणे दरोडा टाकण्यात आला, असे मिश्रा यांनी म्हटले आहे. एबीपी न्यूजशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, देणगी मोजणी प्रक्रियेशी संबंधित समोर येत असलेल्या पुराव्यांवरून संपूर्ण व्यवस्थेत देखरेखीचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. तसेच याबाबत दक्षता घेणारी यंत्रणा जवळपास निष्क्रिय होती. बँक आणि ट्रस्ट यांच्यात झालेल्या करारानुसार देणगीची मोजणी आणि हिशोब ठेवण्याची जबाबदारी बँकेची होती. मात्र प्राथमिक माहितीनुसार बँकेने आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नसल्याचे दिसत आहे.
त्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी पैसे मोजले जायचे तिथे बँकेने स्वतःचे कर्मचारी नियुक्त करणे अपेक्षित होते, परंतु तसे करण्यात आले नाही. हे का घडले याची चौकशी विशेष तपास पथक (एसआयटी) करणार आहे. या प्रकरणातील सत्य तपासातून समोर येईल, असेही त्यांनी नमूद केले.
राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष म्हणून तसेच मंदिराशी संबंधित व्यक्ती म्हणून या विषयावर स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. त्यांनी म्हटले की, ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन झाले असते तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती.
संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवणे आवश्यक होते. देणगी मोजणी प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची स्पष्ट जबाबदारी निश्चित करणे, आत-बाहेर येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करणे आणि संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली ठेवणे बंधनकारक होते. मात्र या सर्व बाबींमध्ये गंभीर त्रुटी राहिल्या, असेही मिश्रा म्हणाले.
या प्रकरणात दोन ठिकाणांहून देखरेखीची व्यवस्था होती. ट्रस्टकडे सीसीटीव्ही यंत्रणा होती, तर पोलिसांच्या नियंत्रण कक्षातूनही निरीक्षण केले जात होते. पोलिसांसाठी प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवणे अवघड असले तरी आवश्यक यंत्रणा अस्तित्वात होती. पण प्रशासनिक व्यवस्थापनाच्या अनुभवाचा गंभीर अभाव या प्रकरणात दिसून आल्याचे मिश्रा यांनी म्हटले.



























































