
इटलीच्या पंतप्रधानांनी माझ्यासोबत फोटो काढण्याची विनवणी केली होती, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मात्र इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, पॅरिसमध्ये झालेल्या जी-७ बैठकीदरम्यान मेलोनी यांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली होती. त्यानंतर ते त्यांच्यासोबत फोटो काढण्यास तयार झाले. मेलोनी यांनी हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सनुसार, मेलोनी म्हणाल्या की, इटली हा कोणासमोरही गयावया करणारा देश नाही. त्यांनी ट्रम्प यांचे हे विधान अयोग्य आणि अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे. यादरम्यान इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांनी मोठी घोषणा करत, आपला पुढील आठवड्यात होणारा नियोजित अमेरिका दौरा रद्द करत असल्याचे सांगितले.
ट्रम्प यांनी हे विधान का केले?
ला-७ ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांना विचारण्यात आले होते की, तुम्ही जी-७ च्या बैठकीत मेलोनी यांच्याशी काय बोलत होतात? ट्रम्प आणि मेलोनी यांच्यातील संवादाचा एक व्हिडीओ व्हायरल होत होता, ज्यामध्ये जी-७ दरम्यान दोन्ही नेते एकमेकांशी बोलत असल्याचे दिसत होते. यावर ट्रम्प म्हणाले की, मेलोनी माझ्याशी बोलताना खूप आनंदी होत होत्या. मला त्यांच्याशी बोलायचे नव्हते, पण त्यांच्या आनंदासाठी मी त्यांच्याशी बोललो. ट्रम्प पुढे म्हणाले की, मला त्यांच्यासोबत दिसायचेही नव्हते, पण मला त्यांची दया आली. ट्रम्प यांनी असाही दावा केला की, मेलोनी यांना माझ्यासोबत फोटो काढायचा होता, पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतो, त्यानंतर त्यांनी माझ्याकडे फोटोसाठी विनवणी केली. मात्र मेलोनी यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.




























































