Telangana News – पाणीपुरी खाल्ल्याने 20 हून अधिक मुलांना विषबाधा! जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लहान असो वा मोठे, पाणीपुरी खाण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. त्यातही रस्त्यावरील ठेल्यावरची पाणीपुरी खाणे अनेकांसाठी आवडीचे असते. मात्र, पाणीपुरी खाण्याचा हाच मोह तेलंगणातील लहान मुलांच्या चांगलाच अंगाशी आला आहे. राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यात ठेल्यावरील पाणीपुरी खाल्ल्याने 20 हून अधिक मुलांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विषबाधा झालेल्या सर्व मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी संध्याकाळी या मुलांनी एका स्थानिक विक्रेत्याकडून पाणीपुरी खाल्ली होती. त्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास अनेक मुलांना अचानक पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. सकाळी मुलांची प्रकृती अधिक बिघडल्याने पालकही घाबरले.

बाधित मुलांची संख्या एकापाठोपाठ एक वाढत गेल्याने पालकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय आणि परिसरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले. मंगळवार संध्याकाळपर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांची संख्या 20च्या वर गेली होती. सध्या डॉक्टर या सर्व मुलांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दरम्यान बहुतांश मुलांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवणार, चौकशी सुरू

सोमवारी संध्याकाळी खाल्लेल्या पाणीपुरीमुळेच मुलांना हा त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज पालकांनी व्यक्त केला आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. ही विषबाधा दूषित अन्नामुळे झाली की अन्य काही कारणामुळे, याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. संबंधित अन्नपदार्थांचे नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील तपास स्थानिक पोलीस आणि आरोग्य विभाग करत आहे.