
दिल्लीतील एका नामांकित डॉक्टरने त्याच्या घरात 15 वर्षांपासून काम करणाऱ्या मोलकरणीची बॅट आणि सुऱ्याने वार करून निर्घृण हत्या केली. सदर मोलकरीण काळी जादू करत असल्याचा त्याला संशय होता. त्यामुळे त्याला तिला कामावरून काढून टाकायचे होते मात्र डॉक्टरची पत्नी ही त्यासाठी तयार नव्हती. त्यावरून त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर डॉक्टरने मोलकरणीची निर्घृणपणे हत्या केली.
मनीष गुप्ता (५० वर्षे) असे आरोपी डॉक्टरचे नाव असून तो एक त्वचारोग तज्ज्ञ आहे. त्याने गुरुवारी सकाळी दक्षिण-पूर्व दिल्लीतील ‘माउंट कैलास’ या उच्चभ्रू भागात राहत्या घरी मोलकरीन मीना (वय ४५) यांच्यावर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला आणि त्यानंतर सुऱ्याने भोसकून त्यांची हत्या केली. मीनाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर मनीष गुप्ताने स्वत:ला पोलिसांच्या ताब्यात दिले.
दक्षिण-पूर्व दिल्लीचे पोलीस उपायुक्त (DCP) हेमंत तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार; आरोपी मनीष गुप्ता याला मीना यांना कामावरून काढून टाकायचे होते, यावरून त्याचा पत्नीसोबत मोठा वाद झाला होता. पत्नीने या गोष्टीला तीव्र विरोध केला होता. पत्नी मीना यांच्या बाजूने बोलत असल्याने मनीष यांना आपल्या कुटुंबात त्यांच्यापेक्षा घरकाम करणाऱ्या महिलेला जास्त महत्त्व दिले जात आहे असे वाटू लागले होते. याच रागातून आणि असुरक्षिततेच्या भावनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
आरोपी १० वर्षांपासून डिप्रेशनमध्ये
तपासात समोर आले आहे की, आरोपी डॉक्टर मनीष गुप्ता गेल्या १० वर्षांपासून डिप्रेशन (Depression) आणि ओसीडी (OCD – Obsessive-Compulsive Disorder) या मानसिक आजारांचा सामना करत असून, त्याच्यावर अँटी-डिप्रेसंट औषधोपचार सुरू होते.
पीडितेचे कुटुंब उद्ध्वस्त
गेल्या १५ वर्षांपासून विश्वासाने काम करणाऱ्या आईच्या अशा अचानक जाण्याने मीना यांचे कुटुंब पूर्णपणे कोलमडले आहे. मीना यांचा मुलगा रॉबिन याने सांगितले, “सकाळी आई नेहमीप्रमाणे घरातून कामासाठी बाहेर पडली होती, ती अगदी बरी होती. अचानक एका मित्राचा फोन आला आणि त्याने आईची हत्या झाल्याचे सांगितले. मला अजूनही यावर विश्वास बसत नाहीये.”


























































