
देशात बेरोजगारीची समस्या वाढत आहे. तसेच अनेक उच्चशिक्षित तरुणांनाही नोकरीच्या संधी मिळत नाहीत. त्यामुळे देशातील शिक्षण पद्धतीबाबत शंका उपस्थित होत आहेत. तसेच देशातील शिक्षण पद्धतीबाबत दिग्गज गुंतवणूकदार, मार्सलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे संस्थापक आणि CIO सौरभ मुखर्जी यांनी महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. मध्यमवर्गीय भारतीयांचा कॉलेजबाबतचा दृष्टिकोन चुकीचा असल्याचे मत मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे. कॉलेजचे शिक्षण आणि पदवीमुळे पुरेशी मूल्यवृद्धी होत नसल्याचे दिसून येत आहे, असेही ते म्हणाले.
देशाची शिक्षण पद्धती अजूनही ‘पाठांतरावर’ (rote learning) आधारित असल्याचे मुखर्जी यांचे म्हणणे आहे. देशात सर्वाधिक उत्पन्न मिळवणारे लोक कदाचित पदवीधर नसून ते लोक आहेत ज्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आणि त्यानंतर शिक्षण थांबवले. मुखर्जी यांनी एका अलीकडील पॉडकास्टमध्ये हे मत व्यक्त केले. त्यात त्यांनी नोकरीच्या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या तरुणांसाठी देशाची शिक्षण पद्धती नेमके काय मूल्य निर्माण करत आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मुखर्जी म्हणाले की, देशाची शिक्षण पद्धती अजूनही ‘पाठांतरावर’ आधारित आहे. घोकंपट्टी करा आणि परीक्षेत तेच ओकून काढा हेच दिसून येते. त्यांच्या मते, हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांना AI (कृत्रिम बुद्धिमत्ता), इलेक्ट्रिक वाहने, बायोटेक, क्लीन-टेक आणि प्रगत विज्ञानावर आधारित जगासाठी तयार करत नाही, असे ते म्हणाले. AI चा विषय बाजूला ठेवा, आपण आकडेवारीमध्येच हे पाहू शकतो, असे म्हणत मुखर्जी यांनी पदवीधरांमधील बेरोजगारीची आकडेवारी या समस्येचे गांभीर्य दर्शवत असल्याचे सांगितले. कॉलेजमधून बाहेर पडणाऱ्या दर १०० पदवीधरांपैकी केवळ तिघांनाच पदवी मिळाल्याच्या वर्षी नोकरी मिळते, असे ते म्हणाले.
निरक्षर लोकांमध्ये बेरोजगारीचा दर सुमारे ३% असताना पदवीधरांमध्ये तो ३०-४०% च्या आसपास आहे. देशात विद्यापीठात न जाणेच अधिक फायद्याचे आहे, असे मुखर्जी म्हणाले. त्यांनी विद्यापीठ प्रणालीचे वर्णन कौशल्य विकासाऐवजी केवळ ‘घोकंपट्टी’ करण्याची प्रक्रिया असे केले. त्यांच्या मते, ही समस्या महाविद्यालयात जाण्यापूर्वीच सुरू होते. शालेय शिक्षणादरम्यानही विचार करण्यावर भर दिला जात नाही. आपली शालेय शिक्षण पद्धती केवळ पाठांतर आणि तेच जसेच्या तसे ओकून टाकण्यावर (रट्टा मारण्यावर) केंद्रित आहे, असे ते म्हणाले. मुखर्जी यांच्या मते, याचा परिणाम असा झाला आहे की, देश प्रगत क्षेत्रांमध्ये (frontier sectors) क्षमता निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहे. आपण एआय (AI), ईव्ही (EV), बायोटेक किंवा क्लीन-टेक यांसारख्या क्षेत्रांत कुठेच नाही, असे ते म्हणाले.
मुखर्जी यांनी सांगितले की, भारतीय नियोक्ते (एम्प्लॉयर्स) एक प्रकारे हेच दर्शवत आहेत की महाविद्यालयीन पदवीमुळे फारसे मूल्यवर्धन होत नाही. त्यांनी आपल्या ‘ब्रेकपॉइंट’ (Breakpoint) या पुस्तकाचा संदर्भ देत सांगितले की, देशात सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्यांपैकी काही लोक असे आहेत ज्यांनी केवळ १२ वीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर शिक्षण थांबवले.
मुखर्जी यांच्या मते, ही केवळ शिक्षणाशी संबंधित समस्या नसून ती एक आर्थिक समस्याही आहे. त्यांनी सांगितले की, जर देशाला आधुनिक जगात स्पर्धा करायची असेल, तर शिक्षण पद्धतीला केवळ पाठांतरावर भर देण्यापासून दूर जाऊन तरुणांना ‘विचार कसा करावा’ हे शिकवण्याकडे वळावे लागेल, असे ते म्हणाले.



























































