
प्रभू श्रीरामांनी मर्यादेचा पाठ शिकवला आहे. ५०० वर्षांपर्यंत राम मंदिरासाठी संघर्ष केला. आणखी १५ दिवस वाट पहा, प्रतीक्षा करा. काळजी करू नका. गुन्हेगार कोणीही असो, त्याला सोडणार नाही, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना दिला.
देणगी चोरी प्रकरणासंदर्भात योगी आदित्यनाथ म्हणाले, की आम्ही ट्रस्टच्या विनंतीवरून एसआयटी (SIT) चौकशी बसवली आहे. एसआयटी सत्य समोर आणेल. मी सर्वांना सांगेन की कोणीही अनावश्यक टिप्पणी करू नये, ज्यामुळे रामभक्तांना दुःख होईल. जर कोणाकडे काही पुरावा असेल तर तो त्यांनी एसआयटीला द्यावा, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
७ जून रोजी सपाचे नेते पवन पांडे यांनी राम मंदिरातून ५ ते ७ कोटी रुपयांपर्यंतची चोरी झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर सपा प्रमुख अखिलेश यादव यांनीही हा मुद्दा उचलून धरला होता. वाद वाढल्यावर भाजप नेते डॉ. रजनीश सिंह यांनी ९ जून रोजी पंतप्रधानांना पत्र लिहून सीबीआय (CBI) चौकशीची मागणी केली. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने मंदिर ट्रस्टकडून यासंदर्भात अहवाल मागवला.
एसआयटीकडून पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र चौकशी
देणगी चोरी प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या एसआयटीने सलग पाचव्या दिवशी अयोध्येमध्ये चौकशी केली. मंदिराचे सरचिटणीस चंपत राय, विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा आणि बांधकाम प्रभारी गोपाल राव यांची एसआयटीने स्वतंत्र चौकशी केली. गुरुवारीदेखील एसआयटीने मंदिराची तब्बल १० तास पाहणी केली होती.





























































