
कॅनडाने आपल्या घरच्या चाहत्यांसमोर गोलधडाका दाखवून देत ऐतिहासिक विजय नोंदवला. बीसी प्लेस स्टेडियमवर कॅनडाने उत्कृष्ट कामगिरी करत कतारला एकतर्फी 6-0 गोल फरकाने पराभूत केले. फिफा विश्वचषकाच्या इतिहासातील कॅनडाचा हा पहिला विजय आहे. कॅनडाच्या विजयाचा नायक जोनाथन डेव्हिड ठरला, ज्याने सामन्यात तीन गोल केले. कॅनडाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. 16 व्या मिनिटाला, साईल लॅरिनने कॅनडाचा पहिला गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 29 व्या मिनिटाला जोनाथन डेव्हिडने एका दमदार गोलने ही आघाडी दुप्पट केली.
पहिल्या सत्राच्या शेवटच्या क्षणांमध्ये डेव्हिडने सामन्यातील कॅनडाचा तिसरा गोल करून कतारला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले. दुसऱया सत्राची सुरुवात कतारसाठी वाईट झाली. कतारचा खेळाडू असीम मदिबोला पिवळे कार्ड बदलून लाल कार्ड करण्यात आले आणि त्याला मैदान सोडावे लागले. त्यामुळे कतारच्या अडचणी आणखी वाढल्या. एका खेळाडूची उणीव कतारला स्पष्टपणे जाणवत होती. ज्याचा कॅनडाने फायदा घेतला.
इस्माईल कोनेच्या जागी मैदानात आलेल्या नॅथन सलिबाने 64 व्या मिनिटाला एक शानदार गोल करून कॅनडाची आघाडी 4-0 पर्यंत वाढवली. त्यानंतर कतारचा बचावपटू मोहम्मद मानाईने बदली खेळाडू जेकब शॅफेलबर्गचा शॉट चुकून स्वतःच्याच जाळ्यात वळवला, ज्यामुळे कॅनडाला 5-0 अशी भक्कम आघाडी मिळाली. स्टॉपेज टाइममध्ये जोनाथन डेव्हिडने कॅनडाचा सहावा गोल करून आपली हॅटट्रिक पूर्ण केली.
दक्षिण आफ्रिका आणि चेकिया यांच्यात बरोबरी
अटलांटाः दक्षिण आफ्रिकेने एक गोलने पिछाडीवर असताना झोकात पुनरागमन करत चेकियाविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधली. या बरोबरीच्या सामन्यामुळे दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकातील आपला पहिला गुण मिळवला. सहाव्या मिनिटाला मिचेल कॅडिलॅकने चेकियासाठी गोल केला, पण 83 व्या मिनिटाला टेबोहो मोकोएनाने पेनल्टीवर गोल करून दक्षिण आफ्रिकेसाठी बरोबरी साधली. अटलांटा स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि चेकिया यांना प्रत्येकी एक गुण विभागून देण्यात आला. या निकालानंतर दोन्ही संघांना दोन सामन्यांनंतर प्रत्येकी एक गुण मिळाला आहे.


























































