
>> स्पायडरमॅन
सोशल मीडियावरील एक साधा, विनोदी व्हिडीओ एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात किती मोठे वादळ आणू शकतो, याचे अंगावर काटा आणणारे उदाहरण म्हणजे हिंदुस्थानी स्टँड-अप कॉमेडियन यश भारद्वाज याच्यासोबत दुबईत घडलेली घटना. या घटनेबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या, पण यशने स्वतः पोस्ट शेअर करत त्याच्यासोबत घडलेला संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आणला आहे.
19 मार्च रोजी यश दुबईत एका शोसाठी गेला असताना त्याला अचानक दुबई पोलिसांचा फोन आला आणि मुख्य कार्यालयात बोलावण्यात आले. कारण होते त्याने बनवलेली एक छोटीशी कॉमेडी रील. या व्हिडीओमध्ये त्याने प्रादेशिक युद्धाच्या परिस्थितीमुळे दुबईत गुगल मॅप कशा चुकीच्या दिशा दाखवत आहे, यावर एक उपरोधिक विनोद केला होता. यशच्या दृष्टीने तो एक सामान्य आणि निरुपद्रवी विनोद होता, पण दुबई प्रशासनाने याकडे अत्यंत गंभीरतेने पाहिले. त्याला थेट राष्ट्रीय सुरक्षेला धोका (National Security Threat) मानून अटक करण्यात आली आणि तब्बल 47 दिवस डिटेंशन सेंटरमध्ये तुरुंगात डांबून ठेवण्यात आले.
5 मे रोजी अखेर त्याला तिथून थेट भारतात डिपोर्ट करण्यात आले. हे 47 दिवस यश आणि त्याच्या कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी होते. शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्टय़ा हे कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेले होते. सुदैवाने या कठीण प्रसंगातून बाहेर पडून यश आता मुंबईत पुन्हा रंगमंचावर परतला आहे.
हा किस्सा म्हणजे परदेशात विशेषतः आखाती देशांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या किती मर्यादित आणि कडक असू शकते, याचा मोठा पुरावा आहे. डिजिटल विश्वात विनोद करताना आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाशी संबंधित मुद्दय़ांवर भाष्य करताना कोणती किंमत मोजावी लागू शकते, हाच या घटनेचा सर्वात मोठा धडा आहे. सध्या काही मोजक्या लोकांनी स्टँड-अप कॉमेडीच्या नावाने जो हैदोस घातला आहे, त्यांच्यासाठी यश भारद्वाजचे उदाहरण हे योग्य मार्गावर परतण्यासाठी मार्गदर्शक ठरेल ही आशा.

























































