
मराठी माणसाच्या अस्मितेसाठी जन्म झालेल्या शिवसेनेच्या 60 वर्षांच्या धगधगत्या वाटचालीत शिवसैनिकांनी खूप काही पाहिले आहे. कित्येक जण आले आणि गेले. मात्र ‘कोण आलं आणि कोण गेलं’ याने शिवसेना कधी संपली नाही. जिद्दीने पुन्हा उभी राहिली. शिवसेना कधी संपणारही नाही. शिवसेनेची सत्ता पुन्हा येणार! कारण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचार आणि स्वाभिमान अजूनही मनगटात आहे, असा दुर्दम्य विश्वास सुप्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांनी आज व्यक्त केला.
शिवसेनेच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात बोलताना कवी चंदनशिवे यांनी समाजातील भेदभाव, सरकारची मनमानी, पक्षफोडी यावर खुमासदार शैलीत सद्यस्थिती मांडली. शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी कधीच झाला नव्हता. शिवसेनेचा जन्म इथल्या मराठी माणसाच्या अस्मितेसाठी झाला. शिवसेना मराठी माणसासाठी लढत राहिली आणि प्रामाणिकपणाने शिवसेनेने अवघ्या महाराष्ट्राला जवळ केले. मात्र कृतघ्न झालेल्यांना याचा विसर पडल्याने हल्ली बरीच गणितं बिघडल्याचा टोलाही फोडाफोडीच्या राजकारणाला लगावला. स्वतःला मूल झालं नाही म्हणून शेजाऱयाला बोलवायचं आणि ऑपरेशन यशस्वी झालं तर तिसराच कुणीतरी पेढे वाटतोय याचं आश्चर्य वाटतंय, अशा शब्दात त्यांनी भाजप-शिंदे गटाच्या तोडा-फोडाफोडीच्या राजकारणाचा समाचार घेतला.
आदित्य साहेब, आता तुम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरा. समोर कितीही मोठी यंत्रणा, पैसा किंवा सत्ता असली तरी घाबरू नका. हा महाराष्ट्र आणि हा सामान्य शिवसैनिक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही जी मेहनत घेताय, जो संघर्ष करताय तो वाया जाणार नाही. आता मागे हटायचं नाही, मैदानात उतरून या गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
देवेंद्रचे ‘देवाभाऊ’ होण्यासाठी 1500 रुपये वाटावे लागले!
भाजपच्या सत्तापिपासू धोरणाचाही चंदनशिवे यांनी समाचार घेतला. तुम्हाला ‘देवेंद्र’चे देवाभाऊ होण्यासाठी 1500 रुपये वाटावे लागले’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. निवडणुकीत मतांसाठी बहिणीच्या ताटात दिलेली ओवाळणी, निवडून आल्यानंतर परत काढून घ्यायलाही हा भाऊ विसरला नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेची पोलखोल केली.
भगवा फडकवत कांबळे जेलमधून बाहेर आला!
…आता कांबळे शिवसैनिक झाला
आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला, मग त्याला फोडण्यासाठी सापळा रचला
त्याला बोलवून बोलवून घेतले, पण कांबळे नाही गेला
ऐकत नाही म्हणून त्याला मग जेलमध्ये टाकला
तिथेसुद्धा ईडीने त्याला तुडवला, पण कांबळे तिथेही नाही रडला… नुसताच कण्हला आणि असा भगवा फडकवत जेलमधून बाहेर आला!
महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्णअक्षरांनी लिहिला जाणारा हा इतिहास आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या दुर्दम्य लढय़ाबद्दल गौरवोद्गार काढले.
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची कुटुंबाप्रमाणे काळजी घेतली!
कोरोना काळातील तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काळात त्यांनी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे काळजी घेतली. त्यावेळी आमची आजी टीव्हीवर फक्त उद्धव ठाकरे यांनाच पाहायची. कारण माझ्या आजीला टीव्हीत दिसणारा मुख्यमंत्री तिच्या लेकासारखा वाटला. माझ्या आईला संकट काळात सख्ख्या भावापेक्षा जवळचा भाऊ वाटला आणि आम्हा सगळ्यांना हा मुख्यमंत्री मामासारखा वाटला.
हसवता हसवता केले अंतर्मुख
‘आमचा कांबळे’ ही समाजातील वास्तव मांडणारी कविता सादर केली. हा कांबळे कुठल्या एका जातीचा नाही. हा कांबळे भारतीय, मराठी आहे. हा कांबळे अस्मिता आणि स्वाभिमान आहे. या कांबळेला काय काय त्रास होत जातो त्याची ही कविता आहे. हा कांबळे शेंडीतून जाणव्यातून मुक्त होऊन प्रबोधनकारांच्या आणि फुले, शाहू, आंबेडकरांच्या जवळ आलेला आहे, असे म्हणत हसवता हसवता त्यांनी सर्वांनाच अंतर्मुख केले.
टाळ्या, हशा आणि शिट्ट्या
स्टॅण्डअप कॉमेडियन मंदार भिडे यांच्या राजकीय टोलेबाजीने सभागृहात हास्यकल्लोळ केला. पूर्वी ज्याचा वाढदिवस असायचा तो शाळेत मित्रांना चॉकलेट वाटायचा. आता जी लोक कधी शाळेतच गेली नाहीत ती परदेशात जाऊन चॉकलेट वाटतायत असा नाव न घेता त्यांनी मोदींना टोला लगावताच सभागृहात टाळय़ा, शिट्टय़ांचा कडकडाट झाला. यावेळी शिवसैनिकांनी ‘मेलोडी मेलोडी’ अशी घोषणाबाजी केली. सामान्यांना घरातला कचरा स्वतः काढावा लागतो. शिवसेनेतला कचरा मात्र आपणहून निघून जातोय, असा चिमटाही त्यांनी गद्दारांना काढला.



























































