मला नेतृत्त्वाची हाव नाही, पण ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही! – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात हिंदुत्त्वाचा आवाज बुलंद करणाऱ्या आणि महाराष्ट्रात मराठी अस्मितेचे तेज फुलवणाऱ्या शिवसेनेचा साठावा वर्धापन दिन शुक्रवारी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात दणक्यात पार पडला. सहा खासदारांनी व्हीप नाकारून गद्दारी केल्याची घटना ताजी आहे. या घटनेमुळे शिवसैनिकांचे रक्त खवळले आहे, हात सळसळत आहेत. महाराष्ट्राच्या मनामनात संताप खदखदत आहे. पक्षाचे नाव, चिन्ह चोरल्यानंतरही वारंवार पक्ष फोडण्याचा, खासदार-आमदार पळवण्याचा प्रकार सुरू आहे. सरकारी यंत्रणांची दडपशाही, निधीची कमतरता, पक्ष फोडण्यासाठी दाखवली जाणारी प्रलोभनं अशा हरप्रयत्नाने शिवसेनेचे लचके तोडले जात आहेत. यासगळ्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार? त्यांचा आसूड कसा कडाडणार? ते काय आदेश देणार याकडे शिवसैनिकांसह संपूर्ण हिंदुस्थानाचं लक्षं लागलं होतं. भाषणाच्या शेवटाकडे जात असताना उद्धव ठाकरे यांनी आपल्याला नेतृत्वाची हाव नसून आता होत असलेले आरोप शिवसैनिकांना मान्य असतील तर आपण पद सोडायला तयार आहोत, अशी भूमिका मांडली. त्यावेळी सभागृहात नाही.. नाही.. नाही… अशा घोषणा झाल्या. पक्षप्रमुखपदावर उद्धव ठाकरेच हवे असे शिवसैनिकांनी सांगितले. यानंतर ज्या प्रमाणे शिवसेनाप्रमुखांनी माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा असे म्हटले होते तसेच मी म्हणतो की, ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाषणाचा समारोप केला.

स्वार्थाने बरबटलेल्या राजकीयक्षेत्रातील काळ्याकुट्ट अंधारात देखील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ती मशाल घेऊन त्यांनी शिवसैनिकांना पुढल्या वाटचालीसाठी मार्गदर्शन केलं. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे अंगावर वार झेलून देखील शत्रूवर तुटून पडणाऱ्या सेनापती सारखं होतं. त्यांच्या शब्दाशब्दांत तोच त्वेष जाणवला. ‘कशासाठी पक्ष फोडताहेत, कशासाठी ही फोडाफोडी सुरू आहे. त्यांना नेमके काय साध्य करायचे आहे. सत्तापिपासू म्हणजे काय वृत्ती असते ते दिसून येत आहे, अशा शब्दांत पक्षफोडणाऱ्यांवर ते अक्षरश: बरसले. ‘आज भाजपकडे संसदेत 2/3 बहुमत नाही पण त्यांच्या खासदारातील 2/3 भाजपबाहेरील उपरे आहेत.’, असं म्हणत त्यांनी दिल्लीश्वरांची पिसं काढली. गद्दारांवर बोलताना,’ ठाकरे कटुंबावर टीका झाली, त्यावेळी या गधड्यांपैकी विरोधकांचे वार झेलायला कोण पुढे आले होते?’, अशा शब्दात त्यांनी तोफ डागली. त्याच्या या ज्वलंत भाषणावेळी समोर असलेला शिवसैनिकांचा शिवसागर पेटून उठल्या सारखा प्रतिसाद देत होता. ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशा घोषणा देत पुढील काळातील लढ्यासाठीचा शंखनाद करत होता. ‘गद्दारांना सोडणार नाही’, ‘उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… आज शिवसेनेचा ६०वा वर्धापन दिन आहे. आणि ६०वा वर्धापन दिन हा हिरक महोत्सव असतो. नेहमी प्रमाणे मी भाषणाची सुरुवात केलेली असली तरी आज विशेष म्हणजे तुम्हाला सगळ्यांना उद्देशून जमलेल्या माझ्या तर आहातच पण मला दिलेल्या हिऱ्याहीपेक्षा मौल्यवान, जीवाला जीव देणाऱ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… आणि ही देणगी वडिलोपार्जित आहे. त्यामुळे कोणीही माइका लाल ही देणगी माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आजचा वर्धापन दिन अनेकांना वाटलं असेल की दुःखी आणि कष्टाने खचून गेलेला शिवसैनिक इथे दिसेल. पण इकडे एक सुद्धा शिवसैनिक खचलेला नाही, उलटं पेटलेला आहे. आणि त्या कांबळेला कसा तुडवला… पुढचं तुम्हाला माहिती आहे. अनेकजण मला सांगाताहेत की उद्धवजी तुम्ही आदेश द्या, म्हटलं आदेश बाळासाहेब कधीच देऊन गेलेत, असे म्हणत उद्धव ठाकरे म्हणाले.

विशेषतः चार खासदारांचा सत्कार तर केलाच. त्यांच्यासोबत आपले हक्काचे २० आमदार आहेत. तुमच्यामध्ये बसलेले अनेक नगरसेवक आहेत. आणि या चॅनेलच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात शिवसेना आणि बाळासाहेबप्रेमी हा कार्यक्रम बघताहेत, तुमचा सत्कार कसा करायचा? माझा जीव ओवाळून टाकला तरी हा सत्कार मी पूर्ण करू शकत नाही. कारण संकटामागून संकटं आली, येतील पुढेही येतील. पण संकटाला पुरून उरणारा शिवसैनिक माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी अहं सुद्धा करणार नाही. ही ६० वर्षे ही काही साधी नव्हती. या ६० वर्षांमध्ये ज्यांनी-ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या, तुरुंगवास भोगले, रक्ताचं पाणी केलं. त्यातले काहीजण आपल्यात आहेत, काहीजण आपल्यात नाहीत, त्या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.

शिवसेनाप्रमुखांसोबतची ती पहिली नेत्यांची फळी ती त्यावेळेला होती मनोहर जोशी, सुधीर जोशी, वामनराव, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलवडे किती नावं घ्यायची. या सगळ्यांनी जे-जे काही त्यावेळेला कष्ट घेतले ते कष्ट आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला दिसताहेत. संकटं अनेक आली. हे काही संकट नाहीच. ज्या वेळेपासून आपण यश अपयश हे निवडणुकीच्या निकालाबरोबर तुलना करायला लागतो तिकडे आपण फसलो. शिवसेनाप्रमुखांनी तेव्हाचे जे गृहमंत्री इंद्रजीत गुप्ता, आपली सत्ता होती आपलं सरकार होतं आणि एक घटना अशी घडली होती की, जणू काय आता हे सरकार बरखास्त करणार. आणि ते गृहमंत्री आले होते. शिवसेनाप्रमुखांना भेटायची इच्छा त्यांनी व्यक्त केली. इंद्रजीत गुप्ता यांनी सगळं बोलल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं, “तुम्ही काय कराल? माझं सरकार बरखास्त कराल ना? एक लक्षात घ्या आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही सत्ता आमच्यासाठी जन्माला आलेली आहे.” ही ६० वर्षे त्याच्यात आणीबाणी आली. आणीबाणीचा काळ आणखी भयानक होता. तेव्हा या सगळ्या आठवणी स्वतः शिवसेनाप्रमुखांनी सांगितलेल्या आहेत. त्यावेळेला रजनी पटेल आज जे आहेत त्यांच्याच राज्याचा हा शिवसेनेच्या मुळावर उठला होता आणि त्याने शिवसेनाप्रमुखांना एक पत्र लिहून दिलं होतं आणि सांगितलं होतं की याच्यावर सही करा, सही नाही केली तर तुम्ही आतमध्ये जाल. ते पत्र असं होतं की जणू काही शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलीन करा. जे आज बोंबलत बसलेत ना, आम्हाला वाटलं शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार, अरे ३० वर्षे भाजपसोबत राहून भाजपात विलीन नाही विलीन झालो तर काँग्रेसमध्ये कोण विलीन होणार? आणि शिवसेनाप्रमुखांनी उत्तर दिलं होतं. सही करणार नाही, फेकून दिलं पत्र आणि सांगितलं, जा तुझ्या पटेलला सांग ज्या क्षणी तू मला हात लावशील तेव्हा बाहेर तुझी प्रेतयात्रा निघालेली असेल तुझी बाहेर. या सगळ्या संकटाला तोंड देत देत आपण इथेपर्यंत आलेलो आहोत. कारणं काहीही सांगताहेत. शिवसेना म्हणे काँग्रेसमध्ये विलीन होण्याची आम्हाला भीती वाटली. मला भीती वाटते महाराष्ट्र भाजप आता मिंधे सेनेत विलीन होईल. एक भाजपवाला सांगत होता की उद्धवजी आमच्यावर काय दिवस आलेत. आम्ही शिवसेनेसोबत भाजपा गावागावात पोहोचवण्यासाठी घरदार विसरून मेहनत केली. पण आता हे उपरे आमच्या डोक्यावरती बसलेत आहेत. आणि म्हणे काय सांगावं, दिल्लीतनं उद्या आदेश येईल जा मिंधेची दाढी खाजवा, म्हटलं कळलं एवढं पुरेसं आहे. आम्हाला खाजवावी लागते दाढी, ही अशी वेळ आली? आहे कुठे तो भाजप? आज भाजपकडे संसदेत दोन तृतियांश बहुमत अजिबात नाही. पण जेवढे भाजपचे खासदार आहेत त्याच्यात दोन तृतियांश सगळे बाहेरचे आहेत. अरे तुम्हाला राजकारणात पोरं होत नाहीत म्हणून आमची का पळवताहेत? तुमच्या वांझोटेपणावर तुम्ही उपचार करा ना, तुमच्यामध्ये विचारांचं वांझोटेपण आहे. आमची कशाला पोरं पळवताहेत? किती पळवाल पळवून पळवून. तुमची पोरं पळवणारी टोळी आणि आमची काय पोरं पुरवणारी टोळी नाहीये. किती घेऊन जाल तुम्ही? आणि काय उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत. बरं उद्धवजी नाही आदित्य ठाकरे फिरले पाहिजेत. मी कोणाला भेटत नव्हतो तर गधड्या तू निवडून कसा आलास? प्रत्येक लोकसभेच्या वेळेला किमान १० ते ६ सभा मी घेतल्या होत्या. तेव्हा हे निवडून आलेत. पण मी जर का गर्वाने म्हटलं की, मी तुला निवडून आणलं, मी तुला तिकीट दिलं, मी तुला मंत्री केलं, मी तुला आमदार केलं, मी तुला विधानसभेतल्या मंत्रिपदाची तिथली खुर्ची दाखवली, तर हा माझा गर्व असेल. पण मी गर्वाने नाही बोलू शकत. कारण मला माहिती आहे की उद्धव ठाकरेला किंमत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आहे. याचं भान मला आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फटकारले.

शहरांमध्ये झाडांची बेसुमार कत्तल सुरू आहे. शहारांमध्ये वडापाव माहिती आहे, पण वटसावित्रीचा वड गेला. त्याच्या भोवती फेऱ्या मारणं गेलं. पण वड मोठा असतो त्याच्या पारंब्या मोठ्या असतात. एखादा लांबून नमस्कार करतो. त्या पारंबीला वाटतं मलाच केला, तुला नाही केला तुझ्या मागच्या खोडाला केला हे लक्षात ठेवा. वड त्याला म्हणतात. आणि मातोश्रीवरती हे शिंतोडे उडवताहेत मला कळत नाही, ही कुठली अवलाद? ज्या शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या रक्तामध्ये स्वाभिमान रुजवला त्या रक्तामध्ये ही भेसळ कुठून आली ही कोणाची अवलाद आहे? मला आठवतंय शिवसेनेची जेव्हा स्थापना झाली तो क्षण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्या क्षणाचे साक्षीदार मी चंदू मामा असे दोन-तीनजण राहिलो असो. मी अनेकदा सांगितलेलं आहे की तुमच्या सगळ्यांपेक्षा सगळ्या ज्येष्ठ शिवसैनिक मी आहे. कारण शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ हा माझ्या समोर फुटलेला आहे आणि त्यातनं उडालेले तुषारे माझ्या अंगावरती उडालेले आहेत. ते उडालेले तुषार मला एवढं भिजवून टाकली याची मला कल्पना नव्हती. पूर्ण शिवसेनेची जबाबदारी माझ्या खांद्यावर येईल. तिथपासून मी शिवसेनेची वाटचाल बघतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आता जे सुरू झालंय ते सगळं ट्रोलिंग, म्हणजे घरबसल्या शिव्या द्यायचं. सगळ्यांना एक सांगायचंय की, मातोश्रीवरती जे जळताहेत, ठाकरे कुटुंबियांवरती जे जळताहेत त्यांना ठाकरे कुटुंबियांनी काय-काय भोगलंय, काय-काय सोसलं आहे याची जरातरी कल्पना आहे का? आपण बोलताना बोलतो की, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर सावित्रिबाई फुले यांचा आहे, आहेच. पण शिवाजी महाराजांच्या वेळेला सुद्धा गद्दार होतेच. शाहू, फुले आंबेडकर सगळ्यांना त्रास झाला आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना धोंडमार आणि शेणमार झालेली आहे. शाहू महाराजांना सुद्धा त्याचा सामना करावा लागला. त्यांची सुद्धा बदनामी झालेली आहे. माझ्या आजोबांना प्रबोधनकार ठाकरे यांना सुद्धा काय काय भोगावं लागलंय, का तर कर्मठ आणि बामणी वृत्ती. ज्या वाईट परंपरा होत्या त्या तोडून मोडून टाकल्या पाहिजेत यासाठी प्रबोधनकार उभे रहिले होते. अनेक वेळेला त्याकाळी आमच्या घरावर मेलेली कुत्री आणि कचऱ्याचे ढिग फेकलेले आहेत. शिवसेनाप्रमुखांनी काय टीका सहन केलीय तुम्हाला माहिती आहे. आज माझ्यावर टीका होतेय, माझ्या पत्नीवरती टीका होतेय, आदित्यवरती घाणेरडे आरोप होताहेत, तेजसवर होताहेत का, तर एका क्षणी ज्यावेळेला भाजपने दगा दिला तेव्हा मला जबाबदारी स्वीकारावी लागली मुख्यमंत्रीपदाची म्हणून हा जळफळाट झाला. मातोश्रीने फक्त वाढायचं काम करायचं जेवायचं काम ते करणार. जे काय मिळेल, मंत्री मीच झालो पाहिजे, मुख्यमंत्री मीच झालो पाहिजे, माझं दिवटं कारटं खासदार झालं पाहिजे, मंत्री झालं पाहिजे, मातोश्रीने भागायचा मातोश्रीला अधिकार नाही, नको हे काही. पण सोसायचं किती? उद्धवजींचं ठीक आहे पण आदित्यने फिरायला पाहिजे. जेव्हा-जेव्हा आमच्या कुटुंबावर हल्ले झाले तेव्हा या गधड्यांपैकी एकतरी छातीची ढाल करून आमच्या समोर उभं राहिला होता, त्यांचे वार झेलायला? आज जी काही गद्दारी झालेली आहे, त्या त्या वॉर्डातील तमाम मतदारांची जाहीर माफी मागतो. कारण त्या सगळ्या मतदारांनी मोदींची लाट असता त्यांच्या विरोधात माझ्यावरती बाळासाहेबांवरती विश्वास ठेवून यांना निवडून दिलं होतं, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, की “आपल्या काही जागा थोडक्यात गेल्या. एक तर इथली जागा चोरलीच गेली. तेव्हा भाजपचे 20 पेक्षा जास्त खासदार होते, ते आज नऊवर आले आहेत. आणि आता पुन्हा फोडाफोडी सुरू आहे. कशासाठी फोडताय? काय मिळवायचं आहे तुम्हाला? सरदार वल्लभभाई पटेल यांनी रझाकारांना हाकलून लावण्यासाठी मराठवाड्यात पोलीस कारवाई केली होती. आणि भाजपने बंगालमध्ये एका महिलेला पराभूत करण्यासाठी अडीच लाख सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात केले. अडीच लाख फौज जर तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी वापरत असाल, तर मणिपूरमध्ये सैन्य का पाठवलं नाही? बारा वर्षे झाली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये फौजा का पाठवल्या नाहीत? उद्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये फौजा पाठवा, शिवसेना तुम्हाला जाहीर पाठिंबा देईल. माझ्या घराण्याचा इतिहास आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्हीही सांगा. आम्ही पाकिस्तानातून आलेलो नाही. आम्ही सुद्धा देशप्रेमी आहोत. तुमच्याइतकेच नाही, तर काकणभर जास्त देशप्रेमी आहोत.

भाजपचं हे हिंदुत्व नाही, हे भोंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व शेंडी-जानव्याचं नाही. आमचं हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे. जो भगव्यात भेद करतो, तो अस्सल हिंदू असूच शकत नाही. त्याच्या रक्तात गद्दारी आणि बेईमानीची भेसळ आहे. भेसळयुक्त रक्ताने भगवा हातात घेऊ नये. आज देशाचं राजकारण ज्या पद्धतीने चाललं आहे, ते पाहून जनतेचा लोकशाहीवरील विश्वास उडत चालला आहे.

आज दोन कवींनी त्यांच्या कविता इन्स्टाग्रामवर सादर केल्या. त्यापैकी एका कवितेची ओळ मला आठवते. आपण म्हणतो, मशालीसमोरचं बटण दाबा, आम्हाला मत मिळेल. काँग्रेस म्हणते, हातासमोरचं बटण दाबा, आम्हाला मत मिळेल. पवार साहेब म्हणतात, तुतारीचं बटण दाबा, आम्हाला मत मिळेल. पण भाजप म्हणते, तुम्ही कोणाचंही बटण दाबा, तो माणूस आमच्याकडेच येणार. मग निवडणुकीचा खर्च करता कशाला?

डॉक्टर आता गोंधळले आहेत की आपण चोरी करतोय की ऑपरेशन करतोय. पण अशीच ऑपरेशनं होत राहिली, तर तुम्हा सगळ्यांना आणि देशाला मिळून ‘ऑपरेशन कमळ’ करावं लागेल. हा लोकशाहीसमोरचा धोका आहे. देश असाच चालत राहिला, तर तो अराजकाच्या दिशेने जाईल, अशी भीती मला वाटते.

मी भाकित करणारा नाही. ज्योतिषावर माझा अजिबात विश्वास नाही. पण माझ्यासमोर बसलेले शिवसैनिक हेच माझं भविष्य आहेत. कारण ज्या देशात तरुणाईला झुरळ म्हटलं जातं, त्या देशाचं भविष्य काय असणार? तुमच्याकडे बहुमत आहे. तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत किंवा इतर काही, विरोधकांना अर्जही भरू द्यायचा नाही. अर्ज भरला की उमेदवाराला उचलून न्यायचं. कशासाठी हे सगळं? एवढं सगळं मिळवून तुम्ही जाणार कुठे? देशाचं काय करणार?

भाजपचे नेते जे. पी. नड्डा म्हणाले होते की देशात फक्त एकच पक्ष राहील. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हा त्याचा एक भाग आहे. पण त्यांची वाटचाल ‘वन पार्टी, नो इलेक्शन’कडे सुरू आहे. एकच पक्ष राहिला पाहिजे, दुसरा पक्ष अस्तित्वातच नसावा, असा त्यांचा प्रयत्न आहे.”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “भाजपसुद्धा कधीकाळी आपला मित्रपक्ष होता. त्यामुळे त्यांना मला एक प्रेमाचा सल्ला द्यायचा आहे. तुम्ही या मार्गाने गेलात, तर दीर्घकाळ सत्ता तुम्हाला लाभणार नाही. आणि ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते समजतो, त्या तरुण पिढीला जर तुम्ही झुरळ समजत असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला स्वातंत्र्य निवडणुका जिंकून मिळालेलं नाही. त्या वयातील तरुणांनी क्रांती केली म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. ती मुलं जर पेटली, तर तुमचं सरकारसुद्धा टिकणार नाही. खुदीराम बोस, अनंत कान्हेरे, भगतसिंग, राजगुरू यांचं वय काय होतं? त्यांची वयं काढा. हे सगळे क्रांतिकारक आजच्या ‘जनरेशन झेड’च्या वयाचेच होते. पण त्यांना हे माहीत होतं की माझा देश स्वतंत्र नाही, माझा देश गुलाम आहे. माझी भारतमाता गुलामगिरीत राहता कामा नये. ‘मी मेलो तरी चालेल, पण माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देईन,’ ही त्यांची भावना होती. आम्हाला शाळेत एक धडा शिकवला जायचा – ‘देश म्हणजे देशातील माणसं; दगडधोंडे नव्हेत.’ आपण सगळे मिळून देश आहोत. पण आपणच जर दगडधोंडे झालो, तर हे स्वातंत्र्य उपभोगणार कोण? एक विचार करून पाहा. उद्या शिवसेनेने निवडणूक लढवायचीच नाही, असं ठरवलं तर भाजप काय करणार? आज शेतकरी रडतो आहे. त्याच्या मालाला हमीभाव नाही. पण आमदार-खासदारांचा हमीभाव मात्र ठरलेला आहे. कैलास पाटील परवा सांगत होते, शेतकऱ्यांना म्हणतात आम्ही कर्जमाफी दिली. आपण तिला कर्जमुक्ती म्हणतो, ते कर्जमाफी म्हणतात. पण त्या कर्जमाफीत इतक्या अटी-शर्ती टाकलेल्या आहेत की शेतकरी म्हणेल, ‘मेलो तरी चालेल, पण तुमचं कर्ज नको.’ ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ अशी अवस्था करून ठेवली आहे. शेतकऱ्याला नीट कर्जमुक्त करायचं नाही. त्याच्या मालाला योग्य किंमत द्यायची नाही. पण आमदार, खासदार, नगरसेवक विकत घ्यायचे आहेत.
इतका पैसा येतो कुठून? निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण’ योजना आणली. आता 80 लाख महिलांची ओवाळणी काढून घेतली. निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि नंतर हात वर करायचे. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. मेहनत तुम्ही केली ना? मतदान तुम्ही केलं ना? मग जाब विचारण्याचा अधिकार तुम्ही का सोडत आहात? मी तुम्हाला आदेश दिला होता – निवडून आणा. तुम्ही निवडून दिलंत. मेहनत तुम्ही घेतली. मग प्रश्न विचारण्याचा अधिकारही तुमचाच आहे. तो अधिकार वापरा. जाब विचारा.

मी स्वतः एक प्रसंग पाहिलेला आहे. कैलास पाटील याचे साक्षीदार आहेत. माझं भाषण संपल्यानंतर एक तुडुंब भरलेल्या सभेत एक शेतकरी माझ्याकडे आला. अंगावर मळके कपडे होते. शेतकऱ्याचे कपडे तसेच असतात. हातात एक छोटासा बटवा होता. तो म्हणाला, ‘उद्धवजी, तुमच्या हस्ते मला आपल्या उमेदवाराला मदत द्यायची आहे.’ त्या बटव्यात किती पैसे असतील? शेतकऱ्याची कमाई किती असते? मी ते पाहिलं नाही. पण तो छोटासा बटवा प्रेमाने देण्यासाठी तो आला होता. आणि त्या प्रेमाच्या एका रुपयाने आपण ती निवडणूक जिंकली होती. समोर पैशाचा महापूर होता. 50 कोटी, 100 कोटी रुपये वाहत होते. कारण एकच – शिवसेनेला हरवायचं. हरामाचा पैसा आपल्या विरोधात ओतला जात होता. पण शेतकऱ्यासारखी साधी, गरीब माणसं आपल्या कष्टाचा पैसा देत होती आणि त्यांनी आपले खासदार निवडून आणले होते. त्या लोकांचे ऋण तुम्ही कुठे फेडणार?”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “हेच उमेदवार पूर्वी भाषणांमध्ये खंडोजी खोपडे यांचं नाव घेत असत. मी नाव घेतलं की तुम्ही काय म्हणायचे? सूर्याजी पिसाळ यांचं नाव घेतलं की तुम्ही काय म्हणायचे? चारशे वर्षे झाली, पण त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का अजून पुसला गेला नाही. मग यांच्या कपाळावरचा शिक्का पुसायला किती वर्षे लागणार? हे प्रश्न ज्यांनी विचारले, त्यांनाच आता विचारा – आज तुम्ही काय म्हणत आहात? तुम्ही महाराष्ट्राचा विश्वासघात करता आहात. त्या वेळी महाराष्ट्राने त्यांचा अश्वमेध रोखला होता. हा पराक्रम महाराष्ट्राने केला होता.

त्यावेळी काँग्रेस आपल्या सोबत होतीच ना? काँग्रेसच्या नेत्यांच्या सभा तुम्हाला हव्या होत्या ना? मग आज अचानक तुम्हाला वाटायला लागलं की शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे? शिवसेना विलीन होण्यासाठी जन्माला आलेली नाही. शिवसेना मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जन्माला आली आहे.

आणि काँग्रेसचा विषय काढलाच आहे, तर तेही सांगतो. काँग्रेसनेही आम्हाला त्रास दिला नाही असं मी म्हणत नाही. माझ्या आयुष्यातील अर्ध्याहून अधिक काळ काँग्रेसविरोधी राजकीय संघर्षात गेला आहे. अत्यंत टोकाचं राजकीय वैर आपण अनुभवलं आहे. तीव्र टीका आपण केली आहे. पण ती टीका का केली? कारण त्या वेळी भाजप आपल्याबरोबर होता. काही वेळा काँग्रेसचे वार भाजपवर होऊ नयेत म्हणून शिवसेनाप्रमुखांनी स्वतःच्या अंगावर घेतले होते. बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर अनेक भाजप नेते मागे सरकले होते. त्या वेळी फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे राहिले होते. कोणासाठी उभे राहिले होते? कोणावरचं संकट त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतलं होतं?

या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरलात. बाबरी प्रकरणात आरोपी क्रमांक एक, दोन किंवा त्यानंतरच्या क्रमांकावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव होतं. त्यांना चौकशांना सामोरं जावं लागलं. सीबीआयची चौकशी झाली. मात्र सीबीआयचे अधिकारी आदराने मातोश्रीवर येऊन त्यांची चौकशी करून गेले. काँग्रेसनेही आमची काही माणसं फोडली होती. काही लोक आपणच पक्षातून काढून टाकले होते, त्यांना त्यांनी घेतलं. पण काँग्रेसने कधी त्या लोकांपैकी कोणाला मुख्यमंत्री केलं नव्हतं. काँग्रेसने कधीही मातोश्रीकडे हावरेपणाने पाहिलं नव्हतं. पण आज भाजप शिवसेनेला मुळासकट उपटून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मातोश्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. हा फरक आहे.

भले काँग्रेस कोणतीही असेल, पण किमान ती आपल्या शब्दाला जागली. मात्र आज जे हिंदुत्वाच्या नावाखाली चाललं आहे, ते वेगळंच आहे.
ज्यांना बाळासाहेबांनी आधार दिला, ज्यांना राजकारणात उभं राहण्याची संधी दिली, त्यांच्याच हातून आज शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बाळासाहेबांनी अनेक संकटं सोसली. अनेक लोकांना उभं केलं. त्याचीच फळं आज आम्हाला दाखवली जात आहेत. राजकारण एवढं गढूळ पूर्वी कधीच झालं नव्हतं. दोन-चार माणसं पक्ष बदलतात, हे राजकारणात होत असतं. पण आज पक्षाच्या पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या पक्षाने तुमचं बोट धरून तुम्हाला उभं केलं, ज्याच्या आधारामुळे लोकांनी तुम्हाला ओळखलं, त्याच पक्षाला संपवण्यासाठी तुम्ही निघाला आहात. पण आता हा फक्त शिवसेनेचा विषय राहिलेला नाही. हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि लोकशाहीच्या भवितव्याचा विषय आहे. म्हणून महाराष्ट्राने विचार केला पाहिजे – शिवसेना हवी आहे की नाही? हा प्रश्न फक्त शिवसैनिकांनी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राने स्वतःला विचारला पाहिजे.”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आजही मी जेव्हा महाराष्ट्रात फिरतो, तेव्हा लोकांच्या डोळ्यांतील प्रेम आणि विश्वास मला दिसतो. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मी सर्वत्र फिरलो नाही. त्याचं कारण एकच होतं – स्थानिक नेतृत्व उभं राहिलं पाहिजे. स्थानिक नेत्यांच्या जीवावर पक्षाची धुरा पुढे गेली पाहिजे. प्रत्येक वेळेला दिल्लीकडून कुणीतरी यायचं आणि निवडणुका जिंकायच्या, असं चालणार नाही. पण आज परिस्थिती अशी झाली आहे की अगदी दूध संघाच्या निवडणुकीपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत प्रत्येक निवडणुकीसाठी पंतप्रधानांना यावं लागतं. ‘भाइयो और बहनो’ म्हणत प्रचार करावा लागतो. मग तुमचे स्थानिक नेते कुठे आहेत? तुमचे खासदार कुठे आहेत? तुमचे आमदार कुठे आहेत? निवडणुका लढा, आम्हाला त्यात काही आक्षेप नाही. पण संकटाच्या काळात जनता आठवते का? गेल्या वर्षी मराठवाड्यावर मोठं संकट आलं होतं. महापुरात शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या. घरं वाहून गेली. भांडीकुंडी वाहून गेली. मुलांची वह्या-पुस्तकं वाहून गेली. त्या वेळी मुख्यमंत्री कुठे होते? उपमुख्यमंत्री कुठे होते? मी, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, कैलास पाटील आणि आपले अनेक आमदार, खासदार व शिवसैनिक त्या लोकांच्या मदतीला धावून गेलो होतो. मी मुख्यमंत्री होतो, हे सांगावं लागतं याचंच दुःख वाटतं. कारण लोकं विसरतात. कोणी मागितलं नव्हतं, तरी मी कर्जमुक्ती दिली होती. तीही कोणत्याही अटी-शर्तींशिवाय. दहा रुपयांत शिवभोजन सुरू केलं होतं. कोरोनाच्या काळात आपण काय केलं, हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. त्या काळात आपण लोकांच्या जीवासाठी काम केलं. राजकारणासाठी नाही. आणखी एक गोष्ट सांगायची आहे. आपल्या घराण्याचा इतिहास तुम्हाला प्रबोधनकार ठाकरे यांच्यापर्यंत माहिती आहे. पण त्यांचे वडील सीताराम ठाकरे यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. जसा कोरोना आला होता, तसाच त्या काळात प्लेग आला होता. आमचं कुटुंब त्या वेळी पनवेलमध्ये राहत होतं. प्लेग म्हणजे मृत्यूचं दुसरं नाव होतं. एखाद्याला गाठ आली की तो माणूस गेला, अशी परिस्थिती होती. त्या काळात मृतदेह उचलायलासुद्धा लोक तयार नव्हते. मृतदेह वाहून न्यायची कुणाची हिंमत होत नव्हती. अशा वेळी प्रबोधनकार ठाकरे यांचे वडील सीताराम ठाकरे आणि त्यांच्या मित्रांनी मृतदेह वाहून नेण्याचं काम केलं. लोकांच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. हा आमच्या घराण्याचा इतिहास आहे. म्हणूनच मी तुम्हाला आज एक प्रश्न विचारतो.आजपर्यंत तुम्ही मला जपलं. कारण शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला सांगितलं होतं – ‘उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा.’ जसं तुम्ही मला जपलं, तसं मीही तुम्हाला जपण्याचा प्रयत्न केला. मी कसा माणूस आहे, हे तुम्हाला माहिती आहे. माझ्याच माणसांनी जर माझ्यावर बोट ठेवलं, तर मी एका क्षणासाठीही त्या पदावर राहणार नाही.
म्हणूनच मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ‘वर्षा’ सोडून ‘मातोश्री’वर परतलो. नाटक करणं मला कधी जमलं नाही आणि त्याची गरजही वाटली नाही. जर मला फक्त पद हवं असतं, तर आजही मी सहजपणे विधान परिषदेत जाऊन बसलो असतो. पण मी तसं केलं नाही.”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “म्हणूनच आज मी तुम्हाला सांगतो, विचार करून उत्तर द्या. शिवसेनेला 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. गेली जवळपास 12-13 वर्षे मी नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत आहे. या काळात अनेक आरोप माझ्यावर झाले. आजही होत आहेत. पण जर ते आरोप तुम्हाला खरे वाटत असतील, तर मला स्पष्ट सांगा. मी या क्षणी या पदावरून पायउतार व्हायला तयार आहे. माझी फक्त एकच अट आहे. ही सोन्यासारखी शिवसेना चोरांच्या, दरोडेखोरांच्या आणि गद्दारांच्या हातात जाता कामा नये. तुमच्यापैकी एखादा सामान्य शिवसैनिक पुढे येऊ द्या. तो शिवसेना पक्षप्रमुख झाला, तर मला त्याचाही अभिमान वाटेल. मला नेतृत्वाची हाव नाही. मला पदाची लालसा नाही. मी आजही हे पद सोडायला तयार आहे. पण ज्यांच्या रक्तात भेसळ आहे, ज्यांनी गद्दारी केली आहे, जे लाचार झाले आहेत, अशा लोकांनी माझ्यावर आरोप करावेत आणि आपण ते मुकाट्याने ऐकत राहावं, हे मला मान्य नाही. त्यांना उत्तर तुम्ही द्यायचं आहे. मी डगमगलेलो नाही. मी खचलेलो नाही. माझ्या आयुष्यात अनेक संकटं आली. अनेक वादळं आली. अनेक प्रसंग आले. पण मी पळणारा माणूस नाही. मी पहाडासारखा उभा राहीन. जबाबदारी स्वीकारेन. पण हे सर्व मी तोपर्यंतच करेन, जोपर्यंत तुमचा माझ्यावर विश्वास आहे. तुमच्या मनात माझ्याबद्दल विश्वास असेल, तोपर्यंत मी ही जबाबदारी पार पाडत राहीन. आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की उद्धव ठाकरे यांनी बाजूला व्हावं, त्या दिवशी मी एका क्षणाचाही विलंब न लावता हे पद सोडून देईन. कारण शिवसेना ही कोणत्याही एका व्यक्तीची मालमत्ता नाही. शिवसेना ही लाखो शिवसैनिकांच्या त्यागातून, संघर्षातून आणि घामातून उभी राहिलेली संघटना आहे. ती जपण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, सजग राहा, जागे राहा, आणि लोकशाही, महाराष्ट्र तसेच शिवसेनेच्या रक्षणासाठी एकजूट राहा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.