IND vs AFG ODI – रोहित शर्माची ‘हॅटट्रिक’, 39 व्या वर्षीही चित्त्याच्या चपळाईने पकडले 3 कॅच, पहा Video

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान संघात चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम मैदानात वन डे मालिकेतील अखेरचा सामना रंगला. नाणेफेक जिंकून अफगाणिस्ताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेल्या हिंदुस्थानने अफगाणिस्तानला एकामागोमाग एक चार धक्के दिले. त्यामुळे अफगाणिस्तानची अवस्था 4 बाद 36 अशी बिकट झाली.

हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा याने अफगाणिस्तानचे पहिले चारही फलंदाज माघारी धाडले. यात त्याला साथ दिली ती हिंदुस्थानचा अनुभवी खेळाडू रोहित शर्मा याने. रोहितने आपल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाने सर्वांनाच थक्क केले. वयाची 39 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही रोहितची मैदानावरील चपळाई वाखाणण्याजोगी होती. त्याने स्लिपमध्ये लागोपाठ तीन उत्कृष्ट झेल घेत वाढते वय केवळ एक आकडा असल्याचे आणि आपली फिटनेस आजही अव्वल दर्जाची असल्याचे सिद्ध केले.

अफगाणिस्तानच्या डावाच्या सुरुवातीलाच प्रसिध कृष्णाने बाऊन्सर टाकत रहमानुल्लाह गुरबाजला चकवा दिला. चेंडू गुरबाजच्या बॅटची बाहेरील कडा घेऊन हवेत उडाला आणि पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माने कोणतीही चूक न करता सोपा झेल टिपला. त्यानंतर रहमत शाह मैदानात आला. एक चौकार मारल्याने तो चांगल्या लयीत दिसत होता. पण प्रसिध कृष्णाने त्यालाही फार वेळ टिकू दिले नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर रहमतने बॅट फिरवली. चेंडू बॅटची कडा घेऊन स्लिपच्या दिशेने गेला आणि रोहित शर्माने दुसरा अप्रतिम झेल घेतला.

अफगाणिस्तान या धक्क्यांमधून सावरतो न सावरतो तोच प्रसिध कृष्णाने इब्राहिम जादरानलाही आपल्या जाळ्यात अडकवले. जादरानच्या बॅटला स्पर्श करून गेलेला चेंडू स्लिपमध्ये उभ्या रोहित शर्माने पुन्हा एकदा अचूक पकडला. रोहितची ही कॅचची हॅटट्रिक पाहून मैदानावरील चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

दरम्यान, यानंतर पॉवरप्लेमध्येच प्रसिध कृष्णाने अफगाणिस्तानला चौथा धक्का दिला. त्याने युवा फलंदाज दरविश रसूलीला श्रेयस अय्यरच्या हाती झेलबाद करत अफगाणिस्तानचे कंबरडे मोडले. तसेच पॉवरप्लेच्या पहिल्या 10 षटकांमध्ये 4 बळी घेणारा प्रसिध हा हिंदुस्थानचा सातवा गोलंदाज ठरला आहे.