अमित शहांनी 4 वर्षांपूर्वी ‘टेस्ट ट्यूब बेबी’ जन्माला घातलं, ते 60 वर्षांचं कसं झालं? संजय राऊत यांचा मिंधे गटाला टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला काल 60 वर्षे पूर्ण झाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन काल जल्लोषात साजरा झाला. सायन येथील षण्मुखानंद सभागृह ओव्हरफ्लो झाले होते. आम्हाला माणसं विकत आणाली लागली नाहीत. उगीच नरडी फोडून भाषणंही करावी लागली नाहीत शिरा ताणाव्या लागल्या नाहीत, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे गटाला लगावला.

मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेचे दोन वर्धापन दिन कसे असू शकतात? चार वर्षांपूर्वी अमित शहांना टेस्ट ट्यूब बेबी जन्माला घातले. त्याला 60 वर्षांचे सर्टिफिकीट कसे देताय? त्यांचे आई-बाप अमित शहा आहे. हा एक चमत्कार असून यावर खूप मोठे संशोधन करावे लागेल. हे संशोधन कुणी केले तर त्याला विज्ञानातील किंवा जीवशास्त्रातील नोबेल मिळू शकते. जीवशास्त्राच्या प्राध्यापकाला मला काही डीएनए अभ्यासासाठी पाठवायचे आहेत. चार वर्षांचे टेस्ट ट्यूब बेबी साठ वर्षांचे कसे झाले हा एक चमत्कारच आहे.

संजय राऊत यांनी यावेळी ऑपरेशन टायगरवरही निशाणा साधला. हे ऑपरेशन टायगर नसून आमच्याकडचे काही कोल्हे पळाले आणि त्यांनी त्या कोल्ह्यांची सुंता केली. सहा खासदार बाजारामध्ये विक्रीसाठी उभे राहिले. शिंद्यांकडे अफाट पैसा असल्याने त्यांनी त्यांना लिलावात विकत घेतले. आपण लिलावात पाहतो की विजय मल्ल्याने गांधींचा चष्मा आणला. कुणी टिपू सुलताची तलवार आणली, तर कुणी ऐतिहासिक चित्र घेतले. तसेच लिलावात हे सहा लोक उभे राहिले. शिंद्यांकडे पैशांचा ओव्हरफ्लो असल्याने त्यांनी त्यांनी विकत घेतले. आता हे सहा लोक शिंद्यांच्या दारात घंटा वाजवत बसतील आणि त्या बदल्यात त्यांना बिदागी मिळेल, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, ओमराजे हा एक भंपक माणूस आहे. ‘राजे’ शब्द काढा असे काल ‘दंगल’कार नितीन चंदनशिवे म्हणाले. त्याची भाषणे ऐका. “मी साधा ग्रामपंचायत सदस्य नव्हतो. मी संकटात होतो, उद्धव ठाकरे यांनी माझे बोट धरून मला आमदार केले. दोन वेळा खासदार केले. मी त्याचे ऋण आयुष्यात विसरणार नाही. मी त्यांना माझ्या जीवनभरात सोडणार नाही. मी जर सोडले तर मला धाराशिवच्या जनतेने मला जोड्याने मारावे.” असा हा माणूस आणि त्याच्यासाठी मी स्वत: उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रचारासाठी तीन दिवस काढले. लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी 94 सभा घेतल्या. बाहेर पडले नाही म्हणता मग या सभा कुणी घेतल्या? चिन्ह आणि पक्ष जाऊनही 9 खासदार निवडून आले. आमची दहावी जागा मिंधे गटाने चोरली. वंदना सूर्यवंशीला फोन लावून निकाल बदलून टाकला, असेही राऊत म्हणाले.

हे बेईमान, गद्दार, बाडगे लोक आहेत. निष्ठा असायला किंवा निष्ठेचे मोल कळायला आई-बाप नेक असावे लागतात. दुसऱ्यांच्या आई-बापाने पोसलेल्या लोकांना निष्ठा काय कळणार? असा सवाल राऊत यांनी केला. ते पुढे म्हणाले की, भाजपने आमच्यातील एक गट फोडून त्यांच्या माध्यमातून ते गोळीबार किंवा चिखलफेक करत आहेत. संपूर्ण देशभरात भाजप हेच करत आली आहे. आपला वापर होतोय हे समोरच्यांना कळायला हवे. तुमची गरज संपली की तुम्हाला उकीरड्यावर फेकून दिले जाईल. आज तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचवताहेत. कारण त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला त्रास द्यायचा आहे. पण आम्ही त्रास करून घेणारी माणसं नाहीत. आमचा चेहरा प्रसन्न असतो, असेही राऊत म्हणाले.

शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी झाला नाही. ज्यांना वाटते की शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी किंवा पैशासाठी असायला पाहिजे त्यांनी पक्ष सोडला. नाही तर सहा खासदार कशासाठी गेले? रोहित पवारांनी 85 कोटींचा आकडा दिला. मी पण तोच आकडा दिला होता. त्यापैकी 15-15 कोटी परवा दिल्लीत आले तेव्हा दिले. जयपूरला जाण्याआधी 10-10 कोटी दिले. मंत्रीपदासाठी स्पर्धा सुरू असून त्यांना शांत करण्यासाठी अधिकचे 25 कोटी रुपये देणार आहेत, असा दावाही संजय राऊत यांनी केला.