
देशभरात सध्या गाजत असलेल्या नीट परीक्षेतील गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. रविवार, 21 जून रोजी होणाऱ्या नीटच्या पुनर्परीक्षेपूर्वी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीचा (एनटीए)निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या एका 18 वर्षीय विद्यार्थ्याला परीक्षेसाठी 2 हजार 500 किलोमीटर दूर असलेल्या युएईमधील अबू धाबी येथील केंद्र देण्यात आले आहे. या अजब कारभारामुळे संबंधित विद्यार्थी आणि त्याचे कुटुंबीय प्रचंड मानसिक तणावाखाली आले असून यावरून आता राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि एनटीएच्या कारभारावर जोरदार निशाणा साधला आहे.
नागपूरच्या विद्यार्थ्याची व्यथा समोर आल्यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. नागपूरचा एक मुलगा महिनाभरापासून नीट पुनर्परीक्षेची तयारी करत होता. मात्र, परीक्षेच्या ठीक आधी जेव्हा त्याने ॲडमिट कार्ड डाऊनलोड केले, तेव्हा त्याचे केंद्र थेट अबू धाबी निघाले! ना पासपोर्ट, ना कुटुंबाकडे परदेशात पाठवण्यासाठी पैसे, ना आता वेळ उरला आहे. तो रात्रभर रडत आहे आणि आता परीक्षा देण्यासच नकार देतोय. या मानसिक तणावाची कुणी कल्पना तरी करू शकते का?”
जी सिस्टीम एका मुलाला त्याच्या स्वतःच्या शहरात परीक्षा केंद्र देऊ शकत नाही, उलट त्याला थेट परदेशात पाठवते, अशा सिस्टीमला परीक्षा घेण्याचा कोणताही अधिकार नाही. ही आता शिक्षण व्यवस्था राहिलेली नाही, तर एका संपूर्ण पिढीच्या पैशांची, वेळेची आणि मानसिक शांततेची केलेली वसुली आहे. आमच्या मुलांच्या भविष्याशी जुगार खेळणे बंद करा, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.
नागपुर का एक बच्चा एक महीने से NEET re-exam की तैयारी कर रहा था।
कल परीक्षा से ठीक एक दिन पहले उसने admit card डाउनलोड किया। उसका सेंटर निकला – अबू धाबी।
न पासपोर्ट, न परिवार के पास विदेश भेजने के पैसे, न अब कोई वक़्त बचा है। वो रातभर रोता रहा, और परीक्षा देने से ही मना कर रहा… https://t.co/TJOHUBnFDB
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 20, 2026
नशीब… इराणमध्ये परीक्षा केंद्र मिळालं नाही..!
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. नागपूरच्या विद्यार्थ्याला NEET परीक्षेसाठी चक्क आबुधाबीचे परीक्षा केंद्र..! काय बोलावं हेच कळत नाही! धन्य ती NTA आणि धन्य ते शिक्षणमंत्री धर्मेंद्रप्रधान..! नशीब… इराणमध्ये परीक्षा केंद्र मिळालं नाही..! असे रोहित पवार म्हणाले.

काय आहे नेमकं प्रकरण?
नागपूरचा रहिवासी असलेल्या अब्दुल्ला मोहम्मद तालीब या विद्यार्थ्याने नीटच्या पुनर्परीक्षेसाठी अर्ज करताना नागपूर, वर्धा आणि भंडारा या जवळच्या शहरांना पसंतीक्रम दिला होता. मात्र, 14 जून रोजी जेव्हा त्याचे हॉलतिकीट आले, तेव्हा त्यावर केंद्र म्हणून अबू धाबी इंडियन स्कूल असे लिहिलेले पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.


























































