चिकन शोरमा… पिझ्झा बाधला, ८० जणांना विषबाधा; भिवंडीच्या खंडूपाड्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यामुळे ८० जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना भिवंडीच्या खंडूपाड्यात घडली. यात एकाच कुटुंबातील सहाजणांसह लहान मुलांचाही समावेश आहे. हे पदार्थ खाल्ल्यानंतर अनेकांना उलटी, मळमळ, जुलाब, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालय गाठले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णांची तपासणी केल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. याप्रकरणी हॉटेलचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी शहरातील खंड्पाडा परिसरात फेमस शोरमाचे दुकान आहे. या दुकानातून नागरिकांनी चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खरेदी करून घरी नेऊन खाल्ले होते. त्यानंतर त्यांना उलट्या, जुलाब, मळमळ, पोटदुखीचा त्रास होऊ लागला. गुरुवारी रात्री १४ जण इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर आज सकाळी २३ जण रुग्णालयात आले. संध्याकाळपर्यंत हा आकडा ८० वर पोहोचला. रुग्णांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक अंदाजानुसार अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगितले. या रुग्णांबरोबरच अजून रुग्ण दाखल होत आहेत, अशी माहिती अधीक्षिका डॉ. माधवी पंदारे यांनी दिली