IND Vs AFG – गुरनूर ब्रारची घातक माऱ्यासह ऐतिहासिक कामगिरी, कोणालाच जमलं नाही ते त्याने करून दाखवलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत नव्या दमाचा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने आपल्या धारधार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या पहिल्याच मालिकेत त्याने चमकदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. पहिल्या दोन सामन्यात त्याने आपल्या गोलंदाजीचा जो दबदबा निर्माण केला होता, तसाच दबदबा आजच्या (20 जून 2026) सामन्यातही पहायला मिळाला. त्याने या सामन्यात एक विकेट घेतली आणि पदार्पणाच्या तीन सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा तो हिंदुस्थानचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

धर्मशाळेत झालेल्या पहिल्याच सामन्यात ब्रारने अवघ्या 27 धावांमध्ये 3 फलंदाजांना तंबूत धाडले. त्यानंतर लखनऊ येथील दुसऱ्या सामन्यातही त्याने आपला हाच फॉर्म कायम ठेवत 3 बळी घेतले. मालिकेतील अंतिम सामन्यात त्याने अफगाणिस्तानच्या अनुभवी मोहम्मद नबीला बाद करत नवा इतिहास रचला. यापूर्वी पदार्पणाच्या वनडे मालिकेत हिंदुस्थानसाठी सर्वाधिक 6 विकेट्स घेण्याचा विक्रम संयुक्तपणे युझवेंद्र चहल (2016 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध) आणि प्रसिद्ध कृष्णा (2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध) यांच्या नावावर होता. ब्रारने या मालिकेत एकूण 7 विकेट्स घेत या दोघांनाही मागे टाकले आहे.

सद्या टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सामना सुरू असून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संपूर्ण डाव 44.2 षटकांमध्ये 218 धावांवर संपुष्टात आला आहे. टीम इंडियाकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 5 विकेट घेत अफगाणिस्तानचा अर्धा संघ माघारी धाडला. तर गुरनूर ब्रार आणि प्रिंस यादव यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. टीम इंडियाला जिंकण्यासाठी 219 धावांची गरज असून यशस्वी जयसवाल आणि रोहित शर्मा फलंदाजी करत आहेत. दोघेही चांगल्या लयीत असून यशस्वीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं असून रोहितने 33 धावांवर फलंदाजी करत आहे. टीम 13 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 101 धावा केल्या असून टीम इंडियाला जिंकण्यासाठी 37 षटकांमध्ये 118 धावांची गरज आहे.