
संगमेश्वर तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. प्रशासनाच्या दडपशाही आणि अजब कारभारामुळे संपूर्ण पांगरी परिसरात तीव्र असंतोष भडकला आहे. एका बाजूला पांगरी ग्रामपंचायत हद्दीत कोणत्याही वैध शासकीय परवानगीशिवाय कायद्याची ऐशीतैशी करत डोंगरात शक्तिशाली भूसुरुंग लावून राजरोसपणे बेकायदा दगड उत्खनन सुरू आहे. या सुरुंगांच्या प्रचंड आणि तीव्र हादऱ्यांमुळे अनेकांच्या हक्काच्या घरांना मोठमोठे तडे गेले आहेत.
या खाणमाफियांच्या मुसक्या आवळण्याऐवजी प्रशासनाने उलटा न्याय लावत, थेट पीडित गावकऱ्यांनाच घरे खाली करण्याची नोटीस बजावली आहे. हे क्षेत्र दरडप्रवण असल्याचे सांगत स्वतःच्या जबाबदारीवर सुरक्षित स्थळी जा, अन्यथा जीवितहानीस तुम्हीच जबाबदार राहाल, असा अत्यंत असंवेदनशील आणि अजब फतवा प्रशासनाने काढल्यामुळे गावकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे.
पांगरी ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन २५ मे २०२६ रोजीच रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना लेखी तक्रार दिली होती. ग्रामसभेत या बेकायदेशीर उत्खननाविरोधात रीतसर ठरावही मंजूर करण्यात आला होता. या पत्रात गावकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला होता की, या बेकायदेशीर सुरुंगांमुळे ग्रामस्थांच्या जीवितास व मालमत्तेस प्रचंड मोठा धोका निर्माण झाला आहे, घरे खचत आहेत, पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटत आहेत आणि धुळीचे प्रदूषण वाढले आहे. परंतु, महसूल प्रशासन आणि पोलिसांनी या गंभीर इशाऱ्याकडे पूर्णपणे डोळेझाक केली. परिणामी, हा खाणमाफिया आजही कायद्याला धाब्यावर बसवून बिनदिक्कतपणे सुरुंगांचे स्फोट घडवून आणत आहे, असा थेट आणि गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाचा अत्यंत संतापजनक चेहरा समोर आला आहे. सुरुंग लावणारा मुख्य गुन्हेगार मोकाट फिरत असताना, गरिबांना मात्र घर सोडण्याची सक्ती केली जात आहे. १२ जून २०२६ रोजी तलाठी कार्यालय पांगरी यांनी दरड कोसळण्याची शक्यता वर्तवत वाडीतील ७ मुख्य कुटुंबप्रमुखांना लेखी नोटीस बजावून थेट धमकीवजा इशाराच दिला आहे. “तुमची घरे अगदी दरड प्रवण क्षेत्रात आहेत आणि भविष्यात पाऊस पडल्यास दरड कोसळू शकते. म्हणून तुम्ही तात्काळ घर खाली करून सुरक्षित स्थळी जावे. तसे न केल्यास होणाऱ्या नुकसानीस तुम्ही स्वतः जबाबदार राहाल आणि शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही,” असा अघोरी पवित्रा प्रशासनाने घेतला आहे.
यावर पांगरीतील जनतेने आता अत्यंत आक्रमक सवाल उपस्थित केला आहे की,गुन्हा खाणमाफियांचा, मग शिक्षा निष्पाप गावकऱ्यांना का?’ गावातील निसर्ग उद्ध्वस्त करणाऱ्या आणि लोकांची घरे धोक्यात आणणाऱ्या बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्याचे काम कायमचे बंद करणे गरजेचे होते. परंतु, मूळ कारणावर घाव घालण्याऐवजी गरिबांना त्यांच्या हक्काच्या घरातून हाकलून लावून खाणमाफियाला अभय देण्याचा हा लाजीरवाणा प्रयत्न असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. आम्ही आमची पिढ्यानपिढ्यांची घरे सोडून कुठे जायचे? आणि बेकायदेशीर काम करणाऱ्याला प्रशासन का पाठीशी घालत आहे? असा जळजळीत सवाल आता पांगरीतील जनता विचारत आहे. जर प्रशासनाने यावर तात्काळ कठोर कारवाई करून ते बेकायदेशीर खाणकाम तात्काळ बंद पाडले नाही, तर संपूर्ण तालुका हादरवून टाकणारे तीव्र आंदोलन छेडण्याचा आक्रमक इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.




























































