
इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जलवाहतूक बंद केल्याची घोषणा केली आहे. इराणने अमेरिकेकडून सामंजस्य कराराचे (MOU) उल्लंघन झाल्याचा दावा केला आहे. तसेच दक्षिण लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यात आलेले अपयश आणि इस्रायलकडून शस्त्रसंधीचे सतत होणारे उल्लंघन ही कारणे देत संतप्त झालेल्या इराणने पुन्हा होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने जगाचे टेन्शन वाढले आहे.
इराणच्या लष्करी कमांडने म्हटले आहे की, लेबनॉनमधील इस्रायली हल्ल्यांमुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आली आहे. इराणने याला पहिले पाऊल म्हटले आहे आणि इशारा दिला आहे की, जर उल्लंघन सुरूच राहिले, तर पुढील कठोर उपाययोजना केल्या जातील.
या आठवड्यात अमेरिका आणि इराणने एका सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली, ज्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली झाली होती. अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी कराराच्या बातमीनंतर काही तासांतच, शनिवारी दक्षिण लेबनॉनमध्ये झालेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये दोन मुलांसह किमान सात जण ठार झाले. त्यानंतर संतप्त झालेल्या इराणने सामुद्रधुनी बंद करत इस्रयलला कठोर शब्दांत इशारा दिला आहे.

























































