
>> डॉ. लतिका भानुशाली
माणूस कविता करतो यामागे काही कारणं असतात आणि त्यापैकी एक कारण म्हणजे व्यक्ती जर अतिसंवेदनशील असेल, आजूबाजूला घडणाऱया प्रत्येक घटनेचे, अनुभवाचे, भावनांचे मनात उमटणारे हिंदोळे जर त्याला स्वस्थ बसू देत नसतील तर ते शब्द, त्या भावना कवितेच्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे बाहेर येतात, प्रकट होतात आणि खऱया अर्थाने अस्सल कविता जन्माला येते. यामिनीची कविता ही अशीच आहे. तिच्या कवितेतून ती काही सांगू पाहते, काही बोलू पाहते. स्वतमधील घुसमट जी आहे ती शब्दांच्या माध्यमातून बाहेर काढते. तिच्या भावनांचा स्फोट इतका उत्कट आहे की, तो व्यक्त होण्यासाठी वृत्तांचं बंधन तिला मान्यच नाही. ती मुक्त छंदामध्ये प्रकट होते.
ही कविता कोणत्याही एका विषयाच्या दावणीला बांधलेली नाही. यात व्यक्तिगत जीवनाचा आलेख तर आहेच, पण सर्वसमावेशक अशा जीवनानुभवाचं संचित याच्यामध्ये दडलेलं आहे. खाजगी अनुभवातून सुरू झालेला हा प्रवास जागतिक अनुभवापर्यंत पोहोचतो. त्यामुळे ‘व्यक्ती ते समष्टी’ असं एक वर्तुळ आहे ते या काव्यसंग्रहामध्ये पूर्ण होतं. तीन भागांमध्ये या कविता विभागलेल्या आहेत.
प्रेमामध्ये असलेली ही परिपूर्णता तिने दोनच शब्दांमध्ये मांडलीय. समाधिस्थ मी, समाधिस्थ तू. प्रतीकात्मक शब्दांमध्ये ती शृंगार व्यक्त करते, पण त्यात कुठेही अश्लीलता अजिबात येत नाही. ‘चांदणस्पर्श’ या कवितेतल्या तिच्या ओळी वानगीदाखल आहेत…
रात्रीची मैफील समेवर येऊन थांबत असताना
चंद्र भैरवी गाऊ लागतो
मग आभाळ पुन्हा एकदा कोरडं…
तुला हव्या असलेल्या रात्रराणीचा गंध झरताना
मला आवडणारा पारिजात उमलू पाहतो
अशा सुंदर नात्यांमध्ये कधी कधी तो उगाच संशयाचं वादळ निर्माण करतो. ती मात्र दुखावते आणि मग लिहिते… ही कविता कधीची?
असं विचारून तू शोधू पाहतोस
माझ्या जुन्या प्रियकराचे संदर्भ.
तुझ्या मनात इतक्या वर्षांनंतरही
जिवंत असलेलं संशयाचं मांजर
बोचकारत राहतं मला.
या भावनांभोवती फिरणाऱया कविता दुसऱया भागात स्वतच्या कोशातनं बाहेर येतात आणि हा काव्यसंग्रह एका उंचीवर जातो. कवितेचं आपल्यावर असलेलं ऋण ती मान्य करते, पण त्याचबरोबर समाज टिपते. मध्यमवर्गीय जीवनाचे कंगोरे, ताणतणाव टिपताना ती लिहिते…
खाणाऱया तोंडांना कधीच कळू शकणार नाही
कमावणाऱया हाताचं दुःख.
मन मारून झालेली असतात स्वप्नांची प्रेतं.
पुढे हे सामाजिक भान व्यक्त करता करता ती राजकीय भानसुद्धा सहज व्यक्त करते. आमच्या पोरापोरींना धर्माच्या दावणीला बांधून
तुम्ही दिल्या त्यांच्या हाती लेखण्यांच्या ऐवजी तलवारी.
आताच्या वातावरणात राजकीय परिस्थितीवर भाष्य करणं अवघड आहे, पण अशाही परिस्थितीत उपरोधिक भाष्य करते…
बस… आता एक करा बापू,
वर्षानुवर्षे धूळ खात अडकवलेल्या
सरकारी कचेरीतील
फोटोफ्रेमची काच जरा पुसून घ्या.
म्हणजे कसं…
तुम्हाला सगळंच लख्ख दिसायला लागेल.
कारण सध्याच्या वातावरणात
तुमची राष्ट्रपित्याची फ्रेम उतरवायला
आणि एखाद्या विश्वगुरूची अडकवायला…
फार वेळ लागणार नाही…’
डेटा स्वस्त आणि जगणं महाग असलेल्या या समाजावर, या ट्रोलर्सवर ती फक्त चार ओळींमध्ये प्रहार करते ः
फुकटचा डेटा आणि रिकामा मेंदू…
फुकटचा डेटा आणि रिकामा मेंदू
यामुळे अपंग झालेले ट्रोलर्स
फक्त जगतात, हगतात
आणि मरून जातात.
हे वास्तव सांगण्याची ताकद तिची या चार ओळींमध्ये आहे. जीवनाच्या गुंतागुंतीला स्पर्श करणारी ही कविता पुढे सामाजिक होते, निसर्ग कविता होते आणि खूप सुंदर शब्दकळा तिच्या कवितांमध्ये येतात.
‘आभाळ पाखरं’, ‘गर्भार झाड’, ‘हिरव्यागार गर्भाला कवितांची भ्रूणहत्या’ अशा शब्दकळांनी ते सौंदर्य कविता आणखी खुलवतात. ‘लुकलुकती पानं बघून जीर्ण झालेल्या खोडालाही फुटतात अक्षरांचे धुमारे…’ अशी ताकदीची काव्यपंक्ती लिहिता लिहिता ती अस्वस्थ होते. कारण हा माणूस, हा निसर्ग युद्धामुळे उद्ध्वस्त होत चाललाय. ती त्यावरही भाष्य करते आणि शेवटी जाता जाता तिला भारतीय तत्त्वज्ञानाचं महत्त्व पटतं किंवा ते जगाला ओरडून सांगावंसं वाटतं आणि ज्ञानेश्वर माऊलींचा जो संदेश आहे तोच ती समाजाला देते, विश्वशांतीचं पसायदान मागते.
त्यामुळे हा काव्याचा प्रवास ‘स्व’पासून सुरू होऊन हळूहळू वैश्विकतेकडे पोहोचतो आणि म्हणून हा काव्यसंग्रह एका वेगळ्या उंचीवर गेला आहे. वाचकांनी, रसिकांनी आवर्जून वाचायला हव्यात अशा आजच्या पिढीतल्या सशक्त कविता यात आहेत, ज्या आपल्या जाणिवा अधिकाधिक समृद्ध करत जातील.
काजळकाठ
कवयित्री ः यामिनी दळवी
प्रकाशन ः ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठे ः 89 ह किंमत ः रु. 200




























































