
>> श्रीपाद भालचंद्र जोशी
[email protected]
ज्या काळात राज्यकर्ते वगळता पारंपरिक राजकीय विरोधी पक्ष, संघटना, निष्प्रभ ठरत आहेत आणि एकछत्री अमलाखाली सारा निमूटपणा आणि सामसूम आहे अशा काळात विद्यार्थी, तरुण वर्ग आपली व देशाची, भविष्याची दिशा जर ठरवू पाहत असतील तर त्याचे केव्हाही स्वागतच व्हायला हवे. अनेक देशी, विदेशी माध्यमांनी ‘काक्रोच’ आंदोलनाची घेतलेली दखल, भारतातील तरुणांचा असंतोष, उच्चभ्रू आणि उच्च मध्यमवर्गीयांचा उद्रेक आणि जंतर मंतरवर जमलेली गर्दी पाहून मानसिक दिलासा मिळतो.
‘पिंक रिव्होल्यूशन’ नावाने लोकप्रिय झालेली अरब देशातील राज्यक्रांत्यांची जी लाट 2011 मध्ये आली होती, तो समूह माध्यमांच्या शक्तीचा पहिला आविष्कार मानला गेला होता. मात्र गर्दीने घडवलेल्या क्रांत्या कशा फसव्या असतात याचेही याच क्रांत्या पुढे आदर्श उदाहरणही ठरल्या होत्या. भारतात याच समूह माध्यम क्रांतीचा पहिला देशव्यापी प्रयोग राजकीय रंगमंचावर सादर केला तो ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या चळवळीने. आभासी गांधी, आभासी माध्यमग्रस्त मध्यमवर्गीयांची, तरुणांची, विद्यार्थ्यांची मेणबत्ती फौज रस्तोरस्ती व गल्लोगल्ली उभी केली. तिच्यामार्फत तत्कालीन सरकारवर आभासी भ्रष्टाचाराचे खरे आरोप केले गेले, पण त्यातले पुढे काहीच सिद्ध झाले नाही. अर्थात तत्कालीन राजकीय सत्ता मात्र उलथवून घेतली गेली.
हे सारे होताच देश जणू संपूर्ण भ्रष्टाचारमुक्त झाल्यासारखा झाला. पेटलेल्या साऱयाच मेणबत्त्या विझवल्या गेल्या. फडकवले जाणारे मोठमोठे राष्ट्रध्वज गुंडाळून ठेवले गेले आणि तो आभासी मध्यमवर्ग, ते आभासी आंदोलन निक्रियदेखील झाले. भ्रष्टाचाराचा राक्षस मात्र अक्राळविक्राळ स्वरूप धारण करत कळस गाठता झाला, भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रम स्थापन करता झाला तरी आधीच्या त्या ‘भ्रष्टाचारविरोधी भारत’ आंदोलनाला जाग आलेली नाही. कोणी त्यांना नंतर त्यांच्या कुंभकर्णी झोपेतून जागवलेही नाही. आता दीड दशकांनंतर पुन्हा एकदा त्याच आभासी माध्यमाच्या, समूह माध्यमांच्या शक्तीचा प्रत्यय भारतातील नवी युवा पिढी आणून देते आहे. समूह माध्यमात उदयाला आलेल्या या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या चमत्कृतजन्य नावाच्या तरुणांच्या गटाने प्रत्यक्षात जंतर मंतरवर हजारो युवा, विद्यार्थी, तरुणांची गर्दी जमवून दाखवली. त्यायोगे तरुणांमध्ये निश्चितच नवा आत्मविश्वास जागवला आहे.
आश्चर्य म्हणजे त्यांनी या देशाच्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलन करण्यासाठी पोलिसांनाकडून परवानगी न मागताच पोलिसांनी तत्परतेने त्यांना ती देऊन कोणतीही आडकाठी न आणता सहकार्य केले, पण त्यामुळे सरकारने इतर पक्षांनी या तरुणांच्या असंतोषाचे नेतृत्व करण्यापेक्षा स्वतःच उभारून घेतलेले ‘सरकारी विरोधास्त्र’ अशा रीतीने या प्रकाराबाबत बोलले गेले. अर्थात सोनम वांगचुक यांनी या पक्षात सरळ प्रवेशच केलेला आहे. अनेक विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन, हा पक्ष, हा विरोध हे राज्यकर्त्यांचेच अपत्य असल्याच्या सिद्धांताला छेद दिला जातो आहे. पुढे जे व्हायचे ते होईल, पण आजच काही राजकीय पक्ष सरळ सरळ या आंदोलनाला पाठिंबा देऊन मोकळे झाले आहेत. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाने आपल्या नेत्यांच्या मार्फत पाठिंब्याची वातावरणनिर्मिती सुरू केली आहे आणि हे सारे आंदोलकांनी नाकारलेले नाही हे महत्त्वाचे आहे. काँग्रेस पक्षानेदेखील या पेपरफुटीप्रकरणी देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. थोडक्यात म्हणजे पूर्णपणे विचारसरणी विहीन असे हे आंदोलन असणार नाही असे दिसते. उद्या खरोखरच या देशातील युवा वर्गाच्या व्यापक असंतोषाचे नेतृत्व या मुलांकडे आलेच तर त्यातून निर्माण वातावरणाचा राजकीय लाभ मिळावा ही दूरदृष्टी काही पक्षांनी बाळगली असेल तर त्यात गैर काहीच नाही, पण हा कॉक्रोच उठाव हा परंपरागत राजकारणाने निर्मिलेल्या समग्र व्यवस्थेच्याच विरोधात आहे हेदेखील लक्षात घेतले पाहिजे.
विचारसरणीचा, विचारसरणी युगाचा अंत झाल्याचा फुकोयामाचा सिद्धांत जगभर लोकप्रिय झाल्याच्या पार्श्वभूमीवर आणि कॉक्रोच उठावामागे कोणतीही शिस्तबद्ध विचारसरणी, पक्ष नसल्याचे दिसत असतानाच परस्पर विरोधी वैचारिक प्रवाहांच्या पक्षांचा लाभलेला पाठिंबा लोकांना गोंधळात टाकणारा आहे. त्यामुळे या आंदोलनाला बळ मिळणार की पारंपरिक राजकीय पक्षांच्या पाठिंब्यामुळे त्यांच्याबाबत पूर्वग्रहदूषित असणारे इकडे शंकेने बघणार, हा प्रश्न आहेच. पारंपरिक पक्षांचा, विचारसरणींचा, त्यांच्या वर्तनाचा कितीही उबग आला तरी कोणतेही परिवर्तन हे विशिष्ट जाहीरनामा, त्यात व्यक्त होणारी विचारसरणी व तो अमलात आणण्यासाठी लागणारी कार्यकर्त्यांची शिस्तबद्ध फौज असल्याशिवाय होऊ शकत नाही. हेही तेवढेच सत्य आहे, पण म्हणून सध्या जमणारी कॉक्रोच समर्थकांची गर्दी पुढे प्रत्यक्ष कृतीपर व्यापक मागण्यांच्या व्यापक आंदोलनात रूपांतरित होणारच नाही असेही नाही.
परिवर्तन, बदल यासाठी कोणत्या तरी विचारसरणीचाच आधार घ्यावाच लागतो. विद्यमान काळात ‘विचारसरणीचा अंत’ हीच एक विचारसरणी म्हणून प्रतिष्ठित केली गेली आहे. माध्यमांचा वापरही त्यासाठीच केला गेला आहे. एककेंद्री, एककल्ली जग निर्माण करून त्यावर विचारसरणीविहीन बाजाराचे वर्चस्व आणि अविवेकी गर्दी प्रोत्साहित करण्यासाठीच ‘विचारसरणीचा अंत’ हा सिद्धांत उच्च मध्यमवर्ग, निम्न मध्यमवर्गात लोकप्रिय, तसेच विद्वत्जनप्रिय करण्यात आल्याचे स्पष्ट आहे. या विचारसरणीचा लाभार्थी हा पाश्चिमात्य तथाकथित उदारीकरणवादी, तंत्रशाही, उच्चभ्रू नोकरशाही व राज्यकर्ता, भांडवलदार वर्ग आहे. विचारसरणीधिष्ठीत सामाजिक बदल, परिवर्तन, क्रांत्या यांची जागा भांडवली व्यवस्थेच्या रक्षणासाठी विचारसरणी विहीन, अविवेकी, बाजाराच्या वर्चस्वाला त्यामुळे दिली गेली आहे. त्यायोगे निम्न वर्ग, कामगार, कष्टकरी अशा मोठय़ा संख्येने असणाऱया वर्गाचे बदलासाठीचे उठाव हे विकासविरोधी, राष्ट्रविरोधी ठरवण्यापर्यंत जगभरातील राज्यकर्त्यांची मजल गेली आहे. याच राज्यकर्त्या वर्गाला आता जगाचे व्यवस्थापन करता येणे अशक्य झाल्याने जगभर ठिकठिकाणी जे उठाव होत आहेत, ते दडपण्याचा प्रयत्न होत आहे. ते शक्य नसेल तर खऱया अर्थाने विरोधाच्या चळवळी उभ्या होण्याअगोदरच ती जागासुद्धा राज्यकर्त्यांनी सोडलेल्या आभासी विरोधकांनी व्यापली जावी, लोकांचा असंतोष परत उफाळणारच असेल तर त्याची सूत्रदेखील राज्यकर्त्यांना सोयीच्या आभासी विरोधकांच्या हाती असावीत, असे प्रयत्न केले जात आहेत. कारण काही का असेना, पण ज्या काळात राज्यकर्ते वगळता पारंपरिक राजकीय विरोधी पक्ष, संघटना, निष्प्रभ ठरत आहेत आणि एकछत्री अमलाखाली सारा निमूटपणा आणि सामसूम आहे अशा काळात विद्यार्थी, तरुण वर्ग आपली व देशाची, भविष्याची दिशा जर ठरवू पाहत असतील तर त्याचे केव्हाही स्वागतच व्हायला हवे.
समूह माध्यमातून कोणत्याही वैचारिक पायाविना, संघटनेविना तसेच शिस्तबद्ध कार्यकर्ते व निश्चित राजकीय भूमिका यांच्याविना उभी होणारी चळवळ कितीही आकर्षक आणि तरुणांच्या असंतोषाचे निदर्शक वगैरे असली तरीही यातून सुस्पष्ट, शांततामय, अहिंसक व लोकशाही परिवर्तनाच्या चळवळीचा खराखुरा राजकीय जाहीरनामा समोर येत नाही, हीदेखील वस्तुस्थिती आहे. तो येत नाही तोवर या गर्दीकडे नुसते आशेने बघत प्रश्न सुटणार नाहीत. मात्र तरीही नव्या तरुणांच्या या नव्या उठावाचे, त्यांच्या प्रतिकार, प्रतिरोध प्रदर्शनाचे स्वागत मात्र करायलाच हवे!




























































