देशोदेशीच्या सीमा ओलांडणारे ‘निवडक केल्याने भाषांतर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘केल्याने भाषांतर’ हे भाषांतरीत साहित्यासाठी वाहिलेले नियतकालिक. या नियतकालिकाच्या गेल्या 27 वर्षांच्या वाटचालीचा एक प्रातिनिधिक आढावा घेणारे पुस्तक ‘निवडक केल्याने भाषांतर’ हे नुकतेच वॉल्डन प्रकाशनाद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे. पुस्तकासाठी भाषांतरांची निवड करताना विशिष्ट आशयसूत्रे ठरवून त्या त्या सूत्रात एकत्र बांधल्या जाणाऱया कथा ‘केल्याने भाषांतर’च्या मागील अंकांतून निवडल्या आहेत. परदेशी भाषांचे मराठीतील भाषांतरीत साहित्य वाचक, लेखक, प्रदेश, संस्कृती यांच्यात एक सेतू निर्माण करते. ‘प्रारंभ’, ’शैशव’, ‘प्रेम’, ‘भवताल’ आणि ‘प्रवास’ या पाच आशयसूत्रांमधून आत्तापर्यंत भाषांतरांच्या वाटे हाती लागलेला हा खजिना संपादित स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचत आहे. या संग्रहात जर्मन, रशियन, स्पॅनिश, फ्रेंच, पोलिश, जपानी या भाषांमधील साहित्य आहे. या  देशोदेशीच्या भाषेच्या साहित्यात असलेले मिथक कथांचे महत्त्व, लहान मुलांचे भावविश्व, प्रेमात बुडालेल्या तरुण प्रेमिकांच्या अनावर ओढीपासून प्रौढ वयातील संयत प्रेमाचा आविष्कार, नागरी अवकाशात आयुष्याला आकार देऊ पाहणाऱया व्यक्तिरेखा, कष्टाने ईप्सित गाठलेले असूनही आयुष्यभर कुठल्यातरी प्रवासाचा वेध घेतलेली माणसे हे सारं जाणून घेत, निरखत वाचकाला घडणारी ही परदेशी साहित्यप्रवासाची सफर नक्कीच आवडेल.