
>> दिव्या सौदागर
[email protected]
इतरांना खूश करण्याच्या वृत्तीमागे दडपशाहीचे बळ कारणीभूत ठरते. दडपशाहीची नकारात्मकता कमी करण्यासाठी कायम पडती बाजू घेणे थांबवले तरच मानसिक स्वास्थ्य चांगले राहू शकते.
मागच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे या लेखात आपण ‘सर्वांना खूश करण्याच्या वृत्ती’बद्दल अधिक जाणून घेऊ यात. ही अशी वृत्ती असलेल्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला हमखास सापडतात. दुसऱया व्यक्तीला खूश करण्याच्या नादात या व्यक्ती इतक्या गुरफटून जातात की, त्यांना स्वतच्या मानसिक शांततेचा विचारच करता येत नाही आणि जेव्हा हे सगळं झेपेनासं होतं तेव्हा त्या व्यक्तींचं बरंचसं वैयक्तिक व कौटुंबिक नुकसान झालेलं असतं.
समरचा संसार त्याच्या या वृत्तीमुळेच घटस्फोटाच्या पायरीपर्यंत आलेला होता. संगीता (दोघांची नावं बदलली आहेत) आता त्याच्या कायम पडतं घेण्याच्या वृत्तीला कंटाळली होती. तिने काडीमोड घेण्याचं कारण म्हणजे समरच्या आयुष्यात तिचं आणि त्यांच्या मुलांना असलेलं दुय्यम स्थान. समरच्या आयुष्यात पहिलं प्राधान्य होतं ते त्याच्या वडिलांना. “नाही मॅम, असं काही नाही’’ समर पटकन उत्तरला.
समर, संगीता आणि त्यांची मुलं हे तसं साधं, मध्यमवर्गीय कुटुंब होतं. समरचे वडील हे त्यांच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून राहत होते. जरा तापट आणि अहंगंड बाळगणारे ते असल्याने घरातली सगळी जण त्यांना वचकून असायची. त्यात समर जास्तच. कारण त्याने त्यांचा राग पाहिला होता. त्या दिवशीचा प्रसंग संगीताच्या डोळ्यांसमोर होता. तिचा वाढदिवस होता आणि समर सगळ्यांना बाहेर जेवायला घेऊन जाणार होता. त्यानेच हॉटेल ठरवलं आणि सरप्राईझ म्हणून तो सगळ्यांना घेऊन जाणार होता. तिथे गेल्यावर त्याचे बाबा “मला काय हवं नको ते पाहिलं नाही तुम्ही’’ म्हणून तडकाफडकी उठून जाऊ लागले. सगळ्यांचा विशेषत संगीताचा मूड गेलाच, पण जेव्हा समरने तिला “घरी गेल्यावर तू बाबांसाठी जेवण बनव’’ असं जेव्हा सांगितलं तेव्हा तिच्या संतापाचा कडेलोट झाला.
“फक्त हा प्रसंग नाही तर असे अनेक प्रसंग आहेत जिथे याच्या बाबांनी मुद्दामहून अडवणूक किंवा त्यांची नाराजी दाखवली आहे. त्यांची भीती सतत आमचा पाठलाग करते.’’ सांगताना संगीताचा आवाज घोगरा झाला आणि ती गप्प बसली. समर शांतपणे ऐकत होता. त्याची जणू त्याला मूक संमती होती आणि हे खरंही होतं. बाबांच्या वर्चस्ववादी वृत्तीला तो दडपून होता की, त्याने संगीता आणि मुलांच्या मनाचा विचारच केला नव्हता. बाबांना त्याला इंजिनीअर झालेलं पाहायचं होतं म्हणून त्याने मेडिकलला न जाता इंजिनीअरिंग निवडलं. जात्याच हुशार असल्याने त्याला तिथेही यश मिळालं आणि चांगली नोकरीही, पण ती टिकवताना त्याला नाकीनऊ यायला लागले होते. मग तो स्वतचा ताण कमी करण्यासाठी संगीताकडून अपेक्षा करायला लागला.
आपल्याच घरातल्या व्यक्तीला एवढं खूश करण्याचा आटापिटा समर का करत होता? हे जेव्हा त्याला विचारलं तेव्हा त्याने जे सांगितलं ते हेलावून टाकणारं होतं. तो सुरुवातीला तसा नव्हता, पण त्याचे वडील आधी जमदग्नीच्या अवतारासारखे होते. त्यांनी त्याच्या आईला असंच त्रासवून सोडलं होतं. एकदा आईने त्यांचं अंथरूण वेळेवर घातलं नाही म्हणून ते तिच्या अंगावर धावून गेले. तेव्हा समर मध्ये पडला आणि त्याने त्यांचा प्रचंड मार खाल्ला.
“त्या दिवसानंतर मी बाबांना आधीपेक्षा प्रचंड घाबरायला लागलोय. माझ्या आईची हतबलता मला अजूनही डिस्टर्ब करते.’’ समरला पुढे बोलवत नव्हतं.
संगीतानेही हे सगळं समजल्यावर घटस्फोटाचा विचार काढून टाकला आणि ती समरस म्हणून त्याच्या बाजूने उभी राहिली. सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे समोरच्या मनात जी बाबांविषयी भीती बसली होती ती त्यांनी केलेल्या शिक्षेमुळे. जेव्हा तो लहान आणि परावलंबी होता, ज्यामुळे ते त्याच्यावर हक्क दाखवू शकले होते. आता मात्र तो प्रौढ, स्वतंत्र व्यक्ती होता, जो स्वतची आणि कुटुंबाची जबाबदारी घेण्यास सक्षम होता व म्हणूनच त्याचे बाबा वृद्धपकाळात त्याच्यासोबत राहायला आले होते. त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या नेतृत्वगुणांचं, प्रामाणिकपणाचं कौतुक झालेलं होतं.
समरकडून एक अजून गोष्ट होत होती ती म्हणजे त्याला “नाही’’ म्हणता येत नव्हतं. त्याची कारणं जरी आता त्याला कळली होती तरी त्याला ती चिंता सतावतच होती. “तू प्रयत्न करून बघत का नाहीस?’’ यावर तो थोडा संभ्रमित झाला. त्याने खरोखरच वडिलांना त्यांनी नेहमीसारखं त्याला काम सांगितल्यावर त्याला जमत नव्हतं म्हणून “नाही’’ म्हटलं व तेवढय़ावरच न थांबता त्याची स्वतची नोकरी आणि वेळ महत्त्वाची आहे असंही त्यांना ठामपणे म्हटलं. अर्थात हे लिहिण्याइतकं सोप्प नव्हतंच. त्यासाठी समरला समुपदेशन सत्रांमध्ये त्या एका ‘नकारा’साठी तयार केलं गेलं होतं. त्याचा आत्मविश्वास, स्व जागृत होण्यासाठी काही मानसोपचार पद्धती वापरल्या गेल्या होत्या. अर्थात याला संगीताची साथ लाभली.
इतरांना खूश करण्याच्या वृत्तीमागे दडपशाही ही वृत्ती महत्त्वाची असते. ज्या घरात अशा व्यक्ती असतात त्या त्यांच्या असण्याने घरातले वातावरण गढूळ करून टाकतात. मग त्यांची नकारात्मकता कमी करण्यासाठी काही संवेदनशील, हळव्या व्यक्ती घरपण टिकवण्यासाठी पडती बाजू घेतात. अशा व्यक्तींनी कायम हे लक्षात ठेवायला हवं की, त्या एकहाती सरसकट सगळ्यांना आनंदी, सुखी ठेऊ शकणार नाहीत. आपल्या कोणाकडेही ती क्षमता नाही. म्हणून महत्त्वाचं, गरजेचं आणि प्राधान्याचं काय हे स्वत ठरवून आयुष्य जगायला सुरुवात केली तर ते सुसह्य होतं आणि आपण कठपुतळी नाही आहोत की कोणीही आपल्याला त्यांच्या तालावर नाचवू शकेल, पण या मर्यादा आपण आपल्या ठरवल्या पाहिजेत आणि त्या सांगताही आल्या पाहिजेत. तरच या ‘केवळ दुसऱयाला खूश करू’ वृत्तीतून आपण स्वततरी बाहेर पडू. कारण दुसरा काय, कसा विचार करतो हे केवळ तोच सांगू शकेल. आपण आधी आपला काय विचार आहे? यावर विचार करणं हे आपल्यासाठी जास्त फायदेशीर आहे. नाही का?
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)




























































