रोखठोक – ‘ब्रुटस’चे ‘बंड’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे सहा खासदार फुटले. हा बेइमानीचा कळस आहे. मशाल चिन्हावर, उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर हे निवडून आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षात हे घडवून भाजप-मिंध्यांनी खोटारडेपणा सिद्ध केला. सहा बेइमान ‘ब्रुटस’ एकत्र आले व आईच्या पाठीत घाव घातला. ‘ब्रुटस’च्या बेइमानीला ‘बंड’ म्हणणारे मूर्ख आहेत.

भारताच्या राजकारणात सध्या बेइमानीने धुमाकूळ घातला आहे. प. बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत नामचीन बेइमान मीर जाफर, जयचंद, ब्रुटस यांचे उदंड पीक पंतप्रधान मोदी यांच्या राजवटीत निघत आहे. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीस 12 वर्षे झाली. या काळात मोदींचे योगदान काय? तर त्यांनी आयाराम गयाराम संस्कृतीला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. महाराष्ट्रात शिवसेनेचे सहा खासदार फुटत असल्याची जोरदार हवा निर्माण झाली. बातम्या जोरात आल्या त्या खोट्या नसाव्यात. कारण अनेक खासदारांनी संपर्क तोडला व अदृश्य झाले. एकनाथ शिंदे यांनी या सर्व खासदारांच्या जिल्ह्यात चार्टर विमाने पाठवून त्यांना दिल्लीस आणले व त्याआधी पंधरा कोटींची बिदागी घरपोच केली. शेवटी हे सगळे लोक स्वत:ला बाजारात विकण्यासाठी उभे राहिले. त्यांची बोली लागली. महाराष्ट्रात हे असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत व त्यास राजकीय अधिष्ठान प्राप्त झाले आहे. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून यायचे व लगेच दुसऱ्या पक्षात ‘विकत’ जायचे. पुन्हा मतदारसंघातील विकासकामांसाठी पक्षांतर केले असे सांगायचे. गायब झालेले एक खासदार भेटले. त्यांचा व माझा संवाद हा एक राजकीय दस्तऐवज ठरावा!

ते खासदार वेळ घेऊन दिल्लीत भेटायला आले.

“साहेब, जरा बोलायचं होतं…!”

“बोला…”

“कसं होणार? काम करणं अवघड झालंय…”

“का? काय झालं?”

“विकासाचा निधीच मिळत नाही. मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षा वाढल्यात. त्यांना निधी हवाय. जरा सरकारशी जुळवून घ्या.”

“सरकारशी कसं जुळवून घ्यायचं? तुमच्याकडे जुळवून घेण्याचा काही फार्म्युला आहे काय?” मी.

“सरकारशी जुळवून घ्या… साहेब.”

“अरे बाबा, स्पष्ट बोला. तुम्हाला तंबू बदलायचा आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही राजकारणातून पूर्ण बाद झाला होता. तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिली, निवडणुकीचा खर्च दिला, कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी केले. उद्धव ठाकरे यांनी प्रचार केला. तेव्हा तुम्ही खासदार झालात. तुम्हाला भाजप व शिंदेविरोधात मतदान झाले. विरोधी पक्षात शिवसेना आहे हे तेव्हा तुम्हाला माहीत होतं ना? सरकारकडून निधी मिळणार नाही व संघर्ष करावा लागेल हेसुद्धा माहीत होतं. आता खासदार झालात. भाव वाढला आणि पक्ष बदलताय?”

“विकासकामांसाठी…”

“…अहो, अद्याप पंतप्रधान मोदींच्या वाराणसीत विकास झाला नाही. तुम्ही कोणत्या विकासाच्या गप्पा मारताय? हा फक्त बहाणा आहे. लोक बोलतात तुम्ही मिंध्यांकडून पंधरा कोटी स्वीकारले. हा कसला विकास निधी म्हणायचा?” त्यावर ते खासदार महाशय तडक निघून गेले.

ठेकेदार खासदार

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत सर्व आमदार-खासदारांना एक प्रकारे ‘ठेकेदार’ बनवले. श्रीमंतीचा नवा मार्ग निर्माण झाला. शिंदे गटात गेलेल्या सर्व खासदारांना 200-400 कोटींचा विकास निधी म्हणजे ठेकेदारीची कामे मिळतात. त्यातले 20 टक्के कमिशन लगेच मिळते व त्यामुळे देशाचा, मतदारसंघाचा विकास होतो. असा हा धंदा सुरू आहे. तृणमूल काँग्रेसचे वीस खासदार फुटले. त्यातील सहा लोकांना प्रत्येकी पाच कोटी दिले व दुसऱ्यांना पुढील तीन वर्षे महिन्याला 50 लाख हातखर्चासाठी देण्याचा करार झाला. या खासदारांनी फुटण्यासाठी हा असा मासिक पगार स्वीकारला. त्यांना दर महिन्याला कोट्यवधी रुपये प. बंगालचे सरकार कोणत्या मार्गाने देणार आहे? ममता बानर्जी यांच्या काळात भ्रष्टाचार बोकाळला असे सांगणारे भाजपचे लोक तृणमूलमधल्या भ्रष्ट नेत्यांना महिन्याला पगार देऊन पोसणार आहेत. आयाराम-गयाराम आणि भ्रष्टाचाऱ्यांना इतकी प्रतिष्ठा याआधी कोणत्याच राजवटीत मिळाली नव्हती. भारतातील राजकीय नीतिमत्तेचे पूर्ण अध:पतन आता झाले. प. बंगालात ममता बानर्जी यांचा पराभव होताच त्यांचे 80 पैकी 60 आमदार भाजपने फोडले. 20 खासदारांना पक्ष सोडायला भाग पाडले. कालपर्यंत जे ममतांची भलामण करीत होते त्यांना एका रात्रीत ममता ‘सैतान’ वाटू लागल्या, हे आश्चर्य आहे. अनेक खासदारांनी भाजपपुढे सरळ शरणागती पत्करली. चीट फंड – नारदसारख्या घोटाळ्यांत त्यांची नावे होती. हे खरे असले तरी याच प्रकरणातले एक आरोपी सुवेंदू अधिकारी हे आता प. बंगालचे मुख्यमंत्री झाले. वास्तविक ते या प्रकरणात पैसे स्वीकारताना पामेरावर दिसले होते. ज्यांनी फुटीर खासदारांचे नेतृत्व स्वीकारले व सगळ्यांना एका ‘त्रिपुरी’ पक्षात विलीन केले त्या डा. काकोली घोष दस्तीदार यांचे नाव चीट फंड घोटाळ्यात आले व पैसे स्वीकारताना त्यांनाही पकडले. मग या तृणमूलच्या खासदारांना भयभीत होण्याचे कारण काय? या चीट फंड घोटाळ्याचे मुख्य आरोपीच प. बंगालच्या सत्तेचे सूत्रधार आहेत. तरीही तृणमूलचे खासदार फुटले व आता नव्या दरोडय़ात सामील झाले. मोदी-शहांना वाटते हे बंड आहे!

हे खरे क्रांतिकारक

शिवसेनेतील 40 आमदार व 12 खासदार फुटले तेव्हा शिंद्यांनी क्रांती केली, बंड केले असे ढोल वाजवले गेले. हा त्या क्रांतिकारकांचा अपमान आहे. मंगल पांडे, वासुदेव बळवंत फडके, तात्या टोपे, झाशीची राणी, भगतसिंग, अशरफ उल्ला खान यांनी स्वातंत्र्यलढ्यात बंड व क्रांती केली. ही क्रांती करण्यासाठी त्यांना कोणी पन्नास कोटी पोहोचवले नव्हते. राष्ट्रीय कार्यासाठी त्यांनी बंड केले. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक निधी देत नाहीत, वेळ देत नाहीत म्हणून या क्रांतिकारकांनी बंड केले नाही. पण तृणमूल काँग्रेस, महाराष्ट्रातला शिंदे गट, अजित पवार गट यांच्या बंडाची तऱ्हा विचित्र आहे. भारताला खड्डय़ात ढकलू पाहणाऱ्या लोकांना मदत व्हावी यासाठी हे बंड आहे. हे सगळे भाजपशी व मिंधे गटाशी आतून मिळाले होते व आहेत. भारतातील कुख्यात बेइमान मीर जाफरशीच त्यांची तुलना करता येईल.

1857च्या प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब सिराजुद्दुल्ला याचा सेनापती असलेल्या मीर जाफरने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या रॉबर्ट क्लाईव्ह याच्याशी गुप्त समझोता केला. युद्धाच्या वेळी त्याने आपले सैन्य अचानक रणांगणातून मागे घेतले. त्या बदल्यात त्याला नवाब बनवण्याचे आश्वासन मिळाले होते. या एका विश्वासघातामुळे भारतात ब्रिटिशांच्या साम्राज्य स्थापनेचा पाया घातला गेला. आजही भारतात आणि अनेक देशांत ‘मीर जाफर’ म्हणजे बेइमान हाच अर्थ घेतला जातो. मीर जाफरची लालच, महत्त्वाकांक्षा भारताच्या गुलामगिरीचे कारण बनली.

ज्युडास इस्कॅरियटने वेगळे काय केले? बायबलमध्ये येशूच्या 12 शिष्यांपैकी एक ज्युडास याने 30 चांदीच्या नाण्यांसाठी येशूला शत्रूंच्या हवाली केले होते.

ज्युलियस सिझरचा विश्वासू मित्र म्हणजे ब्रुटस. त्याचा खास सल्लागार, पण सिनेटमध्ये सिझरची विश्वासघाताने हत्या करणाऱ्यांचे नेतृत्व ब्रुटसने केले. “यू टू ब्रुटस?’ (ब्रुटस, तूसुद्धा) हे सिझरचे शेवटचे वाक्य इतिहासात प्रसिद्ध आहे. मित्राच्या विश्वासघाताने सिझरचा अंत झाला.

व्हिडकुन क्विसलिंग हा दुसऱ्या महायुद्धात नार्वेचा नेता. नाझी जर्मनीशी ‘सौदा’ करून त्याने आपल्या देशाशी गद्दारी केली. त्याचे नाव इतिहासात इतके कलंकित झाले की, इंग्रजीत ‘Ouisling’ हा शब्दच बेइमान, देशद्रोही याच अर्थाने वापरला जातो.

अशा अनेक बेइमानांच्या जागतिक यादीत भारतातील बेइमानांची नावे जोडली जात आहेत. घाऊक पक्षांतरे, त्यासाठी खर्च केला जाणारा अफाट पैसा, हे एक गौडबंगाल बनले आहे. बेइमानी कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठी सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, संविधानाचे चौकीदार एकत्र येतात व ब्रुटसप्रमाणे घाव घालतात. ब्रुटसच्या विश्वासघाताला कोणी बंड, क्रांती म्हणत असतील तर तो मोदी काळातला नवा इतिहास आहे. तो त्यांनीच लिहिला व अमलात आणला. भारतीय लोकशाहीला ब्रुटस, क्विसलिंग, मीर जाफरचे ग्रहण लागले आहे!

विकले गेले

शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन सोहळा सुरू असताना 6 खासदार विकले गेले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात बेइमानीची बीजे रोवली. सत्तेच्या नशेचा हा अतिरेक आहे. ज्यांना शिवसेनेने अंगाखांद्यावर खेळवले, वाढवले, मोठे केले ते सर्व ‘ब्रुटस’ एकत्र झाले. त्यांनी आईच्याच पाठीत खंजीर खुपसला. घायाळ आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून हे सर्व ब्रुटस विकृत हसले व ओरडून म्हणाले, “ब्रुटसने उठाव केला. ब्रुटस बंडखोर झाला.”

महाराष्ट्र अशा बंडखोरीवर थुंकतो हे लवकरच दिसेल.

Twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]