
>>मेधा पालकर
palkarmedha03.gmail.com
पुणे येथील एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले ‘गरुडा’ हे सर्वात मोठे व सर्वाधिक वजनाचे रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमान असणारा ‘प्रोजेक्ट गरुडा’ प्रकल्प भविष्यातील स्वदेशी विमान तंत्रज्ञानासाठी नवी दिशा देणारा ठरला आहे.
भारतीय विद्यार्थी संशोधन आणि एरोस्पेस नवोन्मेष क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरणारी कामगिरी करत MIT Art, design and tecnology university (एमआयटी एडीटी) विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भारतातील सर्वात मोठे रेडिओ-कंट्रोल्ड (आरसी) इलेक्ट्रिक फिक्स्ड-विंग विमान यशस्वीरीत्या डिझाईन, विकसित आणि उड्डाण करून नवा इतिहास घडविला आहे. ‘टीम स्कायट्रेक’ने विकसित केलेला महत्त्वाकांक्षी उपक्रमाला ‘प्रोजेक्ट गरुडा’ची नोंद विक्रमांमध्ये झाली आहे.
एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड सायन्स अंतर्गत एरोस्पेस इंजिनीअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी हे विमान पूर्णपणे स्वबळावर विकसित केले आहे. या प्रकल्पासाठी ‘सेंटर फॉर रिसर्च, इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप फॉर यंग अॅस्पिरंट्स’ (CRIRYA) मार्फत तब्बल 48 लाख रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले.
9.25 मीटर एवढा विशाल विंगस्पॅन आणि 261 किलो वजन असलेले ‘गरुडा’ हे भारतात तयार झालेले सर्वात मोठे व सर्वाधिक वजनाचे रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमान ठरले आहे. यशस्वी उड्डाणानंतर या विमानाची india book of records आणि asia book of record मध्ये भारतातील सर्वाधिक वजनाचे आरसी विमान व सर्वात मोठय़ा विंगस्पॅनचे आरसी विमान म्हणून नोंद झाली आहे. या प्रकल्पाला विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलगुरू डॉ. मंगेश कराड यांचे मार्गदर्शन लाभले. एरोस्पेस विभागप्रमुख डॉ. कमलेश कुलकर्णी, डॉ. सुनील डिंगरे आणि CRIRYA चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष दराडे यांनीही विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रवासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
विद्यार्थ्यांनी विमानाची रचना, स्ट्रक्चरल फॅब्रिकेशन, एरोडायनॅमिक्स विश्लेषण, पिक्सहॉक फ्लाइट कंट्रोलर प्रणाली, आरटीके-जीपीएस आधारित नेव्हिगेशन, इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टिम, फ्लाइट टेस्टिंग आणि रिमोट पायलटिंगसह सर्व तांत्रिक बाबी स्वतंत्रपणे हाताळल्या.
गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या प्रवासात विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. प्रोपल्शन सिस्टिममधील त्रुटी, स्ट्रक्चरल डिझाइनमधील बदल, फ्लाइट कंट्रोलर टय़ुनिंग, प्रतिकूल हवामान आणि अपयशी चाचण्या यांसारख्या अनेक आव्हानांवर त्यांनी मात केली. 2024 मधील प्रारंभीच्या चाचण्यांमध्ये अपयश आल्यानंतरही विद्यार्थ्यांनी हार न मानता फ्लाइट डेटा विश्लेषण, नव्याने डिझाईन, एरोडायनॅमिक्स व्हॅलिडेशन आणि सिस्टिमॅटिक टेस्टिंगद्वारे विमानात सातत्याने सुधारणा केल्या. अखेर 4 मे 2026 रोजी धुळे येथील धावपट्टीवर ‘गरुडा’ने यशस्वी टेक-ऑफ, नियंत्रित उड्डाण आणि सुरक्षित लँडिंग करत एरोस्पेस संशोधनात नवा अध्याय लिहिला.
या प्रकल्पाला शीतल महाजन आणि अमोल यादव यांचे मार्गदर्शनही लाभले. भविष्यात ‘टीम स्कायट्रेक’ ई-व्हीटॉल इलेक्ट्रिक एअर टॅक्सी, स्वॉर्म-ड्रोन सिस्टिमसाठी मदरशिप प्लॅटफॉर्म, संरक्षण आणि नागरी वापरासाठी प्रगत यूएव्ही संशोधन व्यासपीठ विकसित करण्याच्या दिशेने काम करणार आहे.
‘प्रोजेक्ट गरुडा’ हे अनुभवाधारित आणि नवोन्मेषप्रधान शिक्षणाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. राष्ट्रीय पातळीवरील ही मोठी कामगिरी असून अशा प्रकल्पांतून भारताचे भावी एरोस्पेसतज्ञ आणि संशोधक घडतील, असे मत प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केले.
गरुडाची वैशिष्टय़े
- भारतातील सर्वाधिक वजनाचे आरसी विमान – 261 किलो
- सर्वात मोठा विंगस्पॅन – 9.25 मीटर
- प्रकल्पासाठी एकूण निधी – 48 लाख रुपये
- टेक-ऑफसाठी आवश्यक अंतर-200 मीटर
- उड्डाण क्षमता (एन्डय़ुरन्स) – 10 मिनिटे
- कमाल उंची – 100 मीटर
- पेलोड क्षमता – 100 किलोग्रॅम
- कमाल वेग – 80 किमी प्रतितास
- बॅटरी – थ्ग्-झ्द 220 Aप्
- बॅटरी व्होल्टेज – 100 व्होल्ट

























































