
पिण्याच्या पाण्यासाठी दररोजची पायपीट, त्यामुळे पायांना पडणाऱ्या भेगा, डोक्यावर हंडे घेऊन करावा लागणारा संघर्ष.. आणि वर्षानुवर्षे अपूर्ण राहिलेल्या मागण्या.. नेरळच्या ढाकीचा माळ येथील महिलांच्या वेदना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सुनीता मोरे यांनी समजून घेतल्या… मात-भगिनींना आश्वस्त केले आणि त्याच वेदनांना न्याय देत अवघ्या तीन दिवसांत पाणीप्रश्न मार्गी लावला. शिवसेनेने पाण्यासाठी सुरू असलेली फरफट थांबवल्यामुळे या गावातील महिलांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे आनंदाश्रू होते.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील ढाकीचा माळ या आदिवासी वाडीत सुमारे 25 कुटुंबे वास्तव्यास आहेत. ग्रामपंचायत स्थापनेपासून येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. विशेषतः महिलांवर याचा सर्वाधिक परिणाम होत होता. पाण्यासाठीची धावपळ ही त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली होती.
ग्रामस्थांनी आपली व्यथा मांडल्यानंतर सुनीता मोरे यांनी हा विषय केवळ प्रशासकीय प्रश्न म्हणून न पाहता महिलांच्या जगण्याशी जोडलेला प्रश्न म्हणून हाताळला. ‘महिलेचे दुःख महिलेलाच समजते,’ याची प्रचीती देत त्यांनी पंचायत समिती सदस्य भगवान चंचे, ग्रामपंचायत प्रशासन सुजित धनगर, ग्रामसेवक अरुण कारले आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून पाणीपुरवठ्याची व्यवस्था उभी केली.
केवळ आश्वासन नव्हे, संवेदनशील नेतृत्व
अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्यानंतर ढाकीचा माळ येथील महिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. पाण्यासाठीचा रोजचा संघर्ष थांबल्याने ग्रामस्थांनी सुनीता मोरे यांचे विशेष आभार मानले. निवडून आल्यानंतर केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून प्रश्न सोडवणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून सुनीता मोरे यांची ओळख निर्माण होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. ढाकीचा माळ येथील पाणीप्रश्न सोडवून त्यांनी विकासाबरोबरच संवेदनशील नेतृत्वाचेही दर्शन घडविल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
























































