मेडिसिटी, एज्युकेशन सिटी विकास प्रकल्पांची गती वाढवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेट्रोपाठोपाठ सिडकोचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या मेडिसिटी आणि एज्युकेशन सिटी या प्रकल्पांना गती द्या, अशा सूचना सिडकोचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल यांनी प्रशासनाला दिले आहेत. या दोन्ही प्रकल्पांच्या क्षेत्राची मुद्गल यांनी पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

अश्विन मुद्गल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नवी मुंबईत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. शहरात सुरू असलेल्या प्रकल्पाच्या कामांचा दर्जा, गती आणि कार्यक्षमतेवर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नवी मुंबई शहराची जागतिक स्तरावर विशेष ओळख निर्माण करणाऱ्या मेडिसिटी आणि एज्युकेशन सिटी या प्रकल्पांना वेग देण्यासाठी प्रभावीपणे नियोजन करण्यास त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

गुणवत्ता, दर्जा आणि वेळेले महत्त्व देणार

सिडको हे फक्त राज्यातील नाही तर देशातील अग्रगण्य नियोजन व विकास महामंडळ आहे. सिडकोतर्फे राबविण्यात येणाऱ्या वैविध्यपूर्ण महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे महाराष्ट्रासह देशाच्या विकासाला मोठा हातभार लागत आहे. सध्या सिडकोमार्फत साकारण्यात येत असलेले सर्व महत्त्वपूर्ण प्रकल्प नियोजित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे. मेट्रोसह अन्य प्रकल्प लवकर मार्गी लावण्यावर सिडकोचा विशेष भर असणार आहे, अशी प्रतिक्रिया सिडकोचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल यांनी व्यक्त केली आहे.

विकासकामे सुसाट निघणार

अश्विन मुद्गल यांनी यापूर्वी सिडकोमध्ये सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात नवी मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई मेट्रो या प्रकल्पांना गती मिळाली होती. सिडकोचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्याच धर्तीवर आताही विकासकामांना गती मिळणार आहे, असे मत शहरातील रियल इस्टेट तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.