
फिफा वर्ल्ड कपमधील आव्हान टिकवण्यासाठी मैदानात उतरलेल्या तुर्कीएला पराग्वेने जबर धक्का दिला. दहा खेळाडूंसह खेळूनही पराग्वेने 1-0 असा थरारक विजय मिळवत तुर्कीएला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. सलग दुसऱ्या पराभवानंतर तुर्कीएचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले.
अमेरिकेकडून पहिल्या सामन्यात 4-1 अशा दारूण पराभवाचा सामना करावा लागलेल्या पराग्वेने यावेळी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सामन्याच्या अवघ्या 64व्या सेकंदाला माटियास गालार्झाने सुमारे 25 मीटर अंतरावरून जोरदार जमिनीवरील फटका मारत चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला आणि पराग्वेला आघाडी मिळवून दिली. यंदाच्या स्पर्धेतील हा आतापर्यंतचा सर्वात जलद गोल ठरला. यानंतर तुर्कीएने चेंडूवरील नियंत्रण राखत सतत हल्ले चढवले.
पहिल्या सत्राच्या अतिरिक्त वेळेत पराग्वेचा अनुभवी खेळाडू मिगेल अल्मिरॉन याला रेड कार्ड दाखवण्यात आले. मेरत मुल्दूर याच्याशी वाद घालताना तोंड झाकून बोलल्यामुळे व्हिडीओ सहायक पंचांच्या हस्तक्षेपानंतर त्याला मैदानाबाहेर पाठवण्यात आले. विश्वचषकात नव्या नियमाअंतर्गत रेड कार्ड दाखवण्याची ही पहिलीच घटना ठरली.





























































