
>> अक्षय मोटेगावकर
[email protected]
स्पष्ट आणि मनमोकळं बोलणं ऐकताना अगदी थेट मनाला भिडत ‘मन की बात’ मांडणारा ‘अनफिल्टर्ड बाय समधीश’ हा पॉडकास्ट ऐकावा असाच…
आपल्या आयुष्यात किंवा पाहण्यात एखादी व्यक्ती तरी अशी असतेच जी प्रचंड स्पष्टवक्ती असते. जिला कोणत्याच गोष्टीची भीडभाड नसते, जी कोणत्याच गोष्टीचा मुलाहिजा बाळगत नाही आणि त्या क्षणी मनाला येईल ते बोलून मोकळी होते. ती व्यक्ती बोलताना अगदी तर्कशुद्ध बोलते. त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करू शकत नाही, पण तिचा स्पष्टवत्तेपणा हा कधी भीती घालतो, कधी दडपण आणतो, कधी अडचणीत आणतो तर कधी कधी हसायला पण लावतो. अशीच एक व्यक्ती म्हणजे आणि त्या व्यक्तीचा पॉडकास्ट सापडला अॅमेझॉन प्राईम म्युझिकवर. ‘समधीश भाटिया’ याचा ‘अनफिल्टर्ड बाय समधीश’ या नावाचा.
समधीश भाटिया हा मूळचा पत्रकार. स्कुप व्हूप, न्यूज लॉन्ड्री यासारख्या इंटरनेटवरील न्यूज पोर्टलसाठी त्याने काम केले, पण त्यानंतर मुळातच अतिशय गपिष्ट असणाऱया आणि बाहेर फिरण्याचा, लोकांशी बोलण्याचा छंद असलेल्या समधीशने स्वतचा पॉडकास्ट सुरू केला. खऱया अर्थाने अनफिल्टर्ड, जिथे कोणतीही साखरपेरणी नाही, उथळ बोलणे नाही. जे असेल ते स्पष्ट आणि मनमोकळे. तो आढेवेढे न घेता मनात येईल ते स्पष्ट बोलतो आणि कदाचित हीच समधीशची थेट मनाला भिडणारी ‘मन की बात’ असावी.
समधीश राजकीय व्यक्तिमत्त्वांबरोबर आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांबरोबर जसा रमतो तसाच जनमानसात मिसळून, त्यांच्या मूळ समस्या जाणून घेत ग्राऊंड रिपोर्टिंगही करतो. त्याचे काही एपिसोडस् ठळकपणे लक्षात राहिले, त्यापैकी ऐकलेला पहिला पॉडकास्ट म्हणजे बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांचा. त्यांची जनमानसातील प्रतिमा ही गंभीर राजकारण्याच्या स्वरूपातील आहे, पण तरीही समधीश त्यांच्या घरी जाऊन आला. गप्पा मारल्या. त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यक्षेत्रात फिरला, प्रसंगी त्यांना हसवले, तर कधी तिखट प्रश्न पण विचारले. राजकारण, धार्मिक ध्रुवीकरण, लोकांसाठी काय केले पाहिजे, इथपासून ते तुम्ही लग्न समारंभात डान्स करता का? चित्रपट, यूटय़ुब पाहता का, असे प्रश्न विचारत त्याने जो माहोल उभा केला आहे तो ऐकताना मज्जा येते.
त्यानंतर ऐकलेला एपिसोड म्हणजे मेजर जनरल सी. एस. धवन यांच्याबरोबरचा. मेजर जनरल सी. एस. धवन म्हणजे अति विशिष्ट सेवा मेडलने सन्मानित असलेले सैन्य दलातील अत्यंत अनुभवी आणि ज्येष्ठ अधिकारी की ज्यांनी महात्मा गांधींपासूनचा काळ पाहिला, युद्धे पाहिली. त्यांच्या स्मृती अजूनही तल्लख आहेत. फारुक अब्दुल्ला यांचे धवन यांनी कॉलेजमध्ये असताना कसे रॅगिंग केले होते, 1946 मध्ये धार्मिक दंगे चालू असताना एक मुस्लिम व्यक्ती इतरांना कसे वाचवायचा आणि हिंदूबहुल भागात कसे सुखरूप पोहोचवायचा… हे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी येते. नागालँडमध्ये पोस्टिंग झाल्यावरचे किस्से, नेहरू, गांधी, वाजपेयी यांचा काळ.. त्यांचे राजकारण यांच्यावर ते भरभरून बोलतात तेव्हा एक वेगळाच परिप्रेक्ष्य आपल्याला मिळतो. अनुराग कश्यपबरोबरचा भाग देखील दिलखुलास झाला आहे. कुठेही लपवाछपवी नाही. जे आहे जसे आहे तसे अनुराग बोलला आहे. अर्थातच त्यात समधीशचे योगदान आहेच की. त्याने अनुरागला फार मोकळेपणाने बोलू दिले आहे. अगदी घटस्फोट, तो एक पिता म्हणून कसा आहे? त्याला इतर चित्रपटांबद्दल काय वाटते? पुंजीवाद, राजकारण, सौदी अरेबियातील अटकेचे अनुभव, तो काय वाचतो यावर अनुराग भरभरून बोलला आहे.
ज्येष्ठ क्रिकेटपटू, अभिनेते आणि क्रिकेट कोच योगराज सिंग (युवराज सिंगचे वडील) यांच्यासोबतचा भाग मस्त जमून आला आहे. राजकीय विश्लेषक आणि रणनीती तज्ञ प्रशांत किशोर, रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, नागालँडचे उच्च शिक्षण आणि पर्यटन मंत्री तेमजेन ईम्ना अलोंग यांच्यासोबतचे भाग राजकारण आवडणाऱयांसाठी पर्वणी ठरावेत. अनुराग बसू, मनोज पाहावा आणि सुधीर मिश्रा ही आडवळणाची नावे पण या यादीत ऐकायला मिळतील. जरूर ऐका.
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)




























































