
मानवत तालुक्यातील प्रसिद्ध यशवाडी येथे हनुमान मंदिराचे छत कोसळून ढिगाऱ्याखाली अनेक भाविक दबले. दुपारच्या वेळी घडलेल्या या दुर्घटनेत पाच भाविकांचा मृत्यू झाला असून 30 ते 40 भाविक जखमी झाले आहेत.
मानवत तालुक्यातील यशवाडी येथे दर शनिवारी हनुमान मंदिरात दर्शनासाठी भाविकांची तुडुंब गर्दी उसळते. आजही सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाली होती. सध्या मंदिराचे बांधकाम सुरू आहे. दुपारच्या सुमारास अचानक मुख्य मंदिरासमोरील सभामंडपाचे बांधकामाधीन असलेले छत कोसळले. यावेळी मंदिरात मोठय़ा प्रमाणावर भाविक होते. छत कोसळल्याचा प्रचंड आवाज झाल्याने एकच गोंधळ उडाला. ढिगाऱ्याखाली किमान 50 भाविक दबले गेले. जखमींना तत्काळ परभणी येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. या दुर्घटनेत संतोष गडदे, आकाश सुरदोसे, नुमेश अग्रकाल, सूरज कोपरकर, श्रीकृष्ण बलभीम गकारे यांचा मृत्यू झाला.






























































