पिंपळाच्या झाडाला बिब्बे, काळे दोरे, लिंबाची माळ; जादूटोण्याच्या भीतीने राजमाता जिजाऊ तलाव परिसरात दहशत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेरळमधील राजमाता जिजाऊ भोसले तलाव परिसरात अघोरी विद्येचा प्रकार समोर आल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. तलावाजवळील पिंपळाच्या झाडाला लिंबू, बिब्बे आणि काळ्या दोऱ्यांची माळ घालण्यात आली आहे. झाडाला खिळे ठोकून संशयास्पद वस्तू लटकवल्या आहेत. हा जादूटोण्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून त्यांनी दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

नेरळमधील राजमाता जिजाऊ भोसले तलाव परिसरात दररोज सकाळी आणि सायंकाळी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने फेरफटका मारण्यासाठी येतात. शुक्रवारी सायंकाळी नागरिक नेहमीप्रमाणे या परिसरात फेरफटका मारत असताना सामाजिक कार्यकर्ते संदीप म्हसकर यांच्या हा भानामतीचा प्रकार निदर्शनास आला. पिंपळाच्या झाडाचे अर्धवट खोड कापून त्यावर एक लिंबू आणि बिब्बे ठेवून खिळा झाडाला ठोकला होता. याच झाडाला दुसरे लिंबू काळ्या दोऱ्याने झाडाला उलटे लटकविण्यात आले होते. त्या लिंबामध्ये चारही बाजूंनी टाचण्या टोचून त्यांना विचित्र पद्धतीने काळा दोरा गुंडाळलेला होता. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली.

गेल्या काही महिन्यांपासून तलाव परिसरात अशा प्रकारच्या संशयास्पद वस्तू आढळण्याच्या घटना वाढल्या आहेत. हे अघोरी प्रकार थांबवण्यासाठी या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तलाव परिसर हा नागरिकांसाठी विरंगुळ्याचे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याचे महत्त्वाचे ठिकाण असताना अशा प्रकारांमुळे भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर अनेकांनी परिसरात येणे बंद केले आहे.

सार्वजनिक ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या कृत्यांवर कठोर कारवाई करण्याची संदीप म्हसकर यांनी केली आहे. तसेच नागरिकांनी अशा संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले.