
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातून 60 किलो चांदी, मौल्यवान हार आणि चरण पादुका चोरीला गेल्यावरून एसआयटीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
रामलल्लाच्या ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्यादरम्यान या विटा मंदिराला दान करण्यात आल्या होत्या आणि त्या मंदिराच्या पायाभरणीत वापरल्या जाणार होत्या. याप्रकरणी सध्या विशेष तपास पथक सखोल तपास करत आहे. गेल्या सहा दिवसांपासून ‘एसआयटी’चे पथक या चांदीच्या विटांच्या कागदपत्रांची आणि सध्याच्या स्थितीची पडताळणी करत आहे. मात्र, अधिकृत रेकॉर्डमध्ये या चांदीची नोंद, साठवणूक किंवा वापराबाबत कोणतीही स्पष्ट माहिती पोलिसांना मिळालेली नाही. दुसरीकडे, चांदी दान करणाऱया ‘ज्वेलर्स असोसिएशन’चे अध्यक्ष अनुराग रस्तोगी यांनी सांगितले की, देशभरातील सराफा व्यापाऱयांच्या मदतीने ही 60 किलो चांदी गोळा करून मंदिराला देण्यात आली होती. या दानाची अधिकृत पावतीही त्यांच्याकडे आहे.























































