
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर येथील सभेत पोलीस प्रशासनाकडून दडपशाही करत सीमा भागातील मराठी बांधव आणि शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. व्यासपीठावरून अमित शहा हे ‘देशातील घुसखोरांना वेचून-वेचून बाहेर काढू,’ असे वक्तव्य करत होते, त्याच वेळी ‘बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे…’ अशा घोषणा देत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी लक्ष वेधणाऱ्या मराठी भाषिकांना पोलिसांनी अक्षरशः ओढत बाहेर काढले.
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडय़ास केंद्र सरकारकडून सुमारे एक हजार 500 कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या धन्यवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमित शहा यांनी ‘देशभरात बहुतांशी राज्यांत भाजप मित्रपक्षांची सत्ता असून, बंगालमध्येही आशीर्वाद मिळाला आहे. त्यामुळे आता देशातील एक-एक घुसखोर शोधून काढू. तसेच घुसखोरांचा ‘व्होट बँक’ म्हणून वापर करू देणार नाही,’ असा इशारा देत काँग्रेसवर टीकास्त्र्ा सोडले. ‘या देशात जन्मलेला येथेच राहणार,’ असे प्रवचन झोडत असतानाच, ‘बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे…’ अशा घोषणा देत सीमाभागातील मराठी भाषिकांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण कडक पोलीस बंदोबस्तात या मराठी भाषिकांना भरसभेतून ओढून बाहेर काढण्यात आले. यावेळी धक्काबुक्कीही करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत या सर्व मराठी भाषिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर सभेबाहेर थांबलेल्या या मराठी भाषिकांना पोलिसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतले. यावेळी व्यासपीठावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि महायुतीच्या एकाही मंत्री, आमदार, खासदाराकडून मराठी भाषिकांच्या वेदनेची कसलीही दखल घेण्यात न आल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
शेतकरी नजरकैदेत
शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. अमित शहांच्या दौऱ्यात शेतकरी आणखी आक्रमकपणे आंदोलन करतील, यामुळे पोलिसांनी रघुनाथदादा पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली आणि कोल्हापुरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तीन दिवसांपासून नजरकैदेत ठेवले होते.



























































