हुश्श..! अखेर वरुणराजा बरसला, हलक्या ते मध्यम सरींमुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - गणेश पुराणिक

मुंबईसह संपूर्ण राज्याला चातकासारखी वाट पाहायला लावणाऱ्या मान्सूनचे आगमन झाले आहे. रविवारी सकाळी मुंबई शहर, उपनगर आणि नवी मुंबईतील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसल्या. यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रविवारी पहाटेपासून मुंबईसह आसपासच्या भागांमध्ये पावसाची रिमझिम सुरू झाली. मुंबईतील वरळी, घाटकोपर, लोअर परळ, चेंबूर, मानखुर्द भागामध्ये सकाळी सहा ते सात या तासाभरामध्ये सरासरी 20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सकाळी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे कामावर निघालेल्या नोकरदारांची मात्र तारांबळ उडाली.

किमान तापमानात घट

गेल्या संपूर्ण आठवड्यात मान्सून रेंगाळल्यामुळे मुंबईत प्रचंड उकाडा जाणवत होता. तापमान सरासरीपेक्षा खूप जास्त नोंदवले जात होते. मात्र, रविवारी झालेल्या पावसामुळे किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी किमान तापमान 25.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. शनिवारी किमान तापमान 28.6 अंश सेल्सिअस होते. तर सांताक्रूझ वेधशाळेने रविवारी किमान तापमान 26.7 अंश सेल्सिअस नोंदवले आहे.

पावसाचा जोर वाढणार

मुंबईत 22 जूनपासून पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. तसेच 23 ते 26 जून दरम्यान पावसाच्या जोरदार सरी कोसळू शकतात. पश्चिमेकडून येणारे वारे आणि हवेतील अनुकूल बदलांमुळे किनारपट्टीवर आर्द्रता वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ अक्षय सुनील यांनी वर्तवला आहे.

मान्सून का रेंगाळला?

मुंबईमध्ये मान्सून 11 जूनच्या आसपास धडक देतो. मात्र यंदा मान्सून चांगलाच रेंगाळला. अरबी समुद्रावरील मान्सूनचा प्रवाह कमकुवत झाल्याने आणि आवश्यक कमी दाबाच्या प्रणालींचा अभाव असल्यामुळे पावसाचा वेग मंदावला. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून दाखल व्हायला उशीर झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

राज्यात उद्यापासून पाऊस, हवामान खात्याकडून दोन दिवसांचा ‘यलो अलर्ट’