राज्यात उद्यापासून पाऊस, हवामान खात्याकडून दोन दिवसांचा ‘यलो अलर्ट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह संपूर्ण राज्यात पावसाची वाट पाहणाऱयांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. राज्यात सोमवारपासून पाऊस बरसणार असल्याची गोड बातमी हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हवामान खात्याने 22 आणि 23 जून रोजी राज्यासाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे सोमवारपासून संपूर्ण राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जूनच्या सुरुवातीला राज्यातील काही भागात चार दिवस चांगला पाऊस झाल्याने यंदा मान्सून वेळेत आणि नियमित राहील, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. परंतु, मान्सूनने अचानक दडी मारल्याने अनेकांचा घामटा निघाला. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा घटू लागल्याने भविष्यात पाणीटंचाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात मान्सूनची वाटचाल सध्या मंदावली असली तरी सोमवारपासून पावसाला सुरुवात होईल, अशी शक्यता आहे. अरबी समुद्रावरील मान्सूनचा प्रवाह कमकुवत झाल्याने आणि आवश्यक कमी दाबाच्या प्रणालींचा अभाव असल्यामुळे पावसाचा वेग मंदावला आहे. मात्र, विषुववृत्तीय भागातून येणारे वारे (क्रॉस इक्वेटोरियल फ्लो) हळूहळू मजबूत होत असून, त्याचा परिणाम पश्चिम किनारपट्टीवरील पर्जन्यमानावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

  • हवामान तज्ञांच्या मते, 22 जूनपासून कोकण आणि राज्यातील अंतर्गत भागांमध्ये पावसाची शक्यता वाढणार असून, 23 जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागानेदेखील महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागात आगामी आठवडय़ांत पावसाची स्थिती टप्प्याटप्प्याने सुधारण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.