
>> उत्तरा मोने, [email protected]
लहानपणातच झालेल्या न्यूमोनियाने मेंदूवर परिणाम होऊन ‘हेमिपॅरेसिस’ हा आजार झालेल्या पृथ्वी बर्वेची ही कथा. आजाराने खचून न जाता खेळ, अभ्यास, संशोधन या सर्व क्षेत्रांत अव्वल ठरत आयुष्याची बाजी तिने जिंकली आहे.
काही माणसं यशस्वी होतात आणि काही माणसं प्रेरणा बनतात. यशाची व्याख्या पदकांनी, पुरस्कारांनी किंवा सन्मानांनी करता येते; पण प्रेरणा बनण्यासाठी माणसाने संकटांशी झुंज देत स्वतचा मार्ग तयार करावा लागतो. पृथ्वी बर्वेची कहाणी ही अशाच प्रेरणेची कहाणी आहे. एका मुलीची, तिच्या कुटुंबाची, संस्कारांची आणि स्वप्नपूर्तीची ही गोष्ट आहे.
पृथ्वीचा जन्म झाला आणि अवघ्या तेराव्या दिवशी न्यूमोनियाने तिच्या आयुष्यात प्रवेश केला. त्या आजारामुळे तिच्या मेंदूवर परिणाम झाला आणि पुढे तिला ‘हेमिपॅरेसिस’ असल्याचं स्पष्ट झालं. दोन हातांनी करायच्या गोष्टी तिला एकाच हाताने कराव्या लागणार होत्या. अनेक कुटुंबांसाठी हा प्रसंग आयुष्यभराची वेदना ठरला असता. मात्र कामाक्षी आणि जयदेव बर्वे यांनी या परिस्थितीकडे दयाभावाने नव्हे, तर सकारात्मकतेने पाहिलं. या प्रवासात सगळ्यात मोठा कानमंत्र कोणी दिला असेल तर तो डॉ. चित्रा दाभोळकर (Pediatrician ) आणि डॉ. शैला दाभोळकर यांनी. ‘तिची disability तिला तुमच्या डोळ्यात दिसणार नाही याची काळजी घ्या म्हणजे ती जगाला तोंड द्यायला सक्षम होईल.’ हा डॉक्टरांनी दिलेला सल्ला ते अक्षरश जगले. म्हणूनच पृथ्वीने स्वतला कधी वेगळं समजलं नाही; उलट तिने स्वतला एक सामान्य, सक्षम मुलगी म्हणूनच पाहिलं.
या प्रवासात तिचा मोठा भाऊ शंतनू हा तिचा पहिला मित्र, मार्गदर्शक आणि आधारस्तंभ ठरला. शाळेत जाण्यापासून घरातील कामांपर्यंत पृथ्वीला कधी विशेष सवलत दिली गेली नाही. याच साध्या गोष्टींनी तिच्या मनात स्वावलंबन आणि आत्मविश्वास रुजवला.
पृथ्वीची जडणघडण केवळ घरच्या प्रेमातून झाली नाही, तर घरातल्या मूल्यांमधून झाली. समाजाला मदत करण्याची वृत्ती, प्रत्येक माणसाचा आदर करण्याची शिकवण आणि मेहनतीवर असलेला विश्वास हे संस्कार तिला घरातून मिळाले. तिच्या आईने फिजिओथेरपीसाठी साताऱयाहून पुण्यापर्यंत केलेला प्रवास केवळ उपचारांचा नव्हता; तो एका आईच्या निश्चयाचा प्रवास होता. आई कामाक्षी बर्वे या प्रसिद्ध बरवा स्कीन थेरपीच्या प्रणेत्या, तर वडील जयदेवजी हे सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात काम करणारे तज्ञ. दोघांनीही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हार न मानता पृथ्वीला जिद्दीने वाढवलं.
पृथ्वीच्या बाबतीत एक चांगली गोष्ट होती. तिचा आजार वयानुरूप वाढणारा नव्हता. मेंदूच्या इतर भागात त्याचा प्रसार होत नव्हता. त्यामुळे तिच्या बुद्धीवर त्याचा परिणाम नाही झाला. घरातल्या वातावरणामुळे तिच्या मेंदूचा विकास चांगला झाला. वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षीच तिने गजेंद्र अहिरेच्या ‘पोस्टकार्ड’ या फिल्ममध्ये गिरीश कुलकर्णी आणि सई ताम्हणकर यांच्याबरोबर काम केलं होतं. सगळ्याच बाबतीत पृथ्वीची प्रगती चांगली चालली होती. अभ्यासातही पृथ्वी तितकीच उजवी ठरली. शाळेत कायम अव्वल ाढमांक मिळवणारी ही मुलगी पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाली. खेळ आणि शिक्षण यांचा समतोल साधत तिने प्रतिष्ठेचा ‘फर्ग्युसन गौरव पुरस्कार’ मिळवला.
त्यानंतर देशातील अत्यंत मानाच्या हरयाणातील सोनिपत येथील अशोका युनिव्हर्सिटीच्या ‘यंग इंडिया फेलोशिप’साठी तिची निवड झाली. बौद्धिक क्षमतेचा कस पाहणारी आणि तरुणांना भविष्यातील नेतृत्वासाठी सज्ज करणारी ही देशातील अत्यंत मानाची शैक्षणिक फेलोशिप मानली जाते. अत्यंत मानाचा ‘चान्सलर्स स्कॉलरशिप’चा सन्मानही तिने पटकावला. हे यश तिच्या बौद्धिक क्षमतेचं आणि चिकाटीचं प्रतीक आहे. मात्र पृथ्वीची खरी ओळख तिच्या खेळातून घडली. 2012 च्या ऑलिंपिकमध्ये एका दिव्यांग खेळाडूला पाहून तिच्या मनात खेळाचं बीज रुजलं. तिने स्वतसाठी टेबल टेनिस या खेळाची निवड केली आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. राष्ट्रीय स्पर्धांमधील पदकांपासून जॉर्डन, थायलंड आणि दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत तिने भारताचा झेंडा अभिमानाने उंचावला. सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई करत तिने सिद्ध केले की, मर्यादा शरीरात असू शकतात, इच्छाशक्तीत नाहीत. ‘घरातून कधीच कोणत्याच गोष्टीची सक्ती माझ्यावर झाली नाही, उलट जे हवं ते करण्याची मोकळीक असल्यामुळेच मी इथपर्यंत मजल मारू शकले.’ असं पृथ्वीने आवर्जून सांगितलं.
खरं तर आईवडिलांसाठी या काळात अनेक कसोटीचे क्षण येतात, जे कामाक्षी आणि जयदेव यांच्या आयुष्यातही आले. अगदी 6-7 महिन्यांपासून काही टेस्ट अगदी वेदनादायक होत्या. त्या पाहणं पालकांसाठी किती वेदनादायी असू शकतात याचा अनुभव त्या दोघांनाही आला. कामाक्षीताईनी एकच प्रसंग सांगितला, जो हृदय हेलावून टाकणारा होता. पृथ्वी आठ वर्षांची होती तेव्हा तिच्या हातावर एक शस्त्रक्रिया करायची होती. काही कारणाने दिवसभर ही शस्त्रक्रिया पुढे जात राहिली आणि शेवटी रात्री 10 वाजता तिची शस्त्रािढया झाली. शस्त्रक्रियेनंतर महिनाभर तिचा हात आणि पाय प्लास्टरमध्ये असे. असं तीन वेळा करावं लागले. असे कितीतरी प्रसंग पृथ्वीच्या आयुष्यात आले आणि गेले; पण कुटुंबाच्या पाठींब्यामुळे ती या प्रसंगांचा सामना करू शकली. आज एक उत्तम खेळाडू आणि उत्तम व्यक्ती म्हणून वयाच्या 21व्या वर्षीही उत्तम समज तिला आहे म्हणूनच ती तिच्या पायावर ठाम उभी आहे.
पृथ्वी बर्वेची कथा ही केवळ एका खेळाडूची यशोगाथा नाही. ती एका कुटुंबाने आपल्या मुलीवर ठेवलेल्या विश्वासाची, भावंडांच्या नात्यातील जिव्हाळ्याची आणि स्वप्नांना पंख देणाऱया संस्कारांची कथा आहे. म्हणूनच पृथ्वी आज केवळ पदकविजेती नाही; ती अनेक तरुणांसाठी आशेची, जिद्दीची आणि आत्मविश्वासाची जिवंत प्रेरणा आहे.




























































