
कान्होपात्राने आपल्या काव्यशैलीतून पंढरीचे माहात्म्य वर्णिले आहे. गणिकेच्या घरी जन्म झाल्यामुळे कान्होपात्रास देवळात जाता येत नव्हते, ही खंत कान्होपात्रेस लागली होती. बालपणी नामदेवांच्या अभंगांत कान्होपात्रा हरवून जायच्या. त्यांच्या परिचित अभंगातील हा एक अभंग. ‘नको देवराया अंत आता पाहू। प्राण हा सर्वथा जाऊ पाहे। हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले। मज लागी जाहले तैसे देवा।।’ या अभंगातील आर्तता, करुणा, व्याकुळता मनाला भिडते. दारावरून जाणाऱया वारीचे कुतूहल असणाऱया कान्होपात्रेला वारीत सामील झाल्यावर मिळालेला जिव्हाळा, प्रेम, आस्था हा तिच्या भक्तीचा पाया होता. नामस्मरणाने देवाच्या हृदयात स्थान मिळते, हा वारीत मिळालेला संदेश कान्होपात्रेस विठ्ठलाजवळ घेऊन गेला. त्यांच्या व्यक्तिमत्वात अपार निष्ठा आणि उदंड श्रद्धा जाणवते. त्यांच्या अभंगात पांडुरंगाचा महिता गाताना ज्ञानदेव, मुक्ताई, नामदेव, जनाबाई अशा सगळ्या संताना त्यांनी गुंफले आहे. ‘मोकलीन आस जाहले मी उदास। घेई कान्होपात्रेस हृदयात।।’ असे विठ्ठलाला भक्तिभावाने सांगणाऱया कान्होपात्रा संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयात संत परंपरेचा वसा घेऊन विसावलेल्या आहेत.




























































