‘महाकुंभ’च्या आडून राम मंदिरात देणगी घोटाळा? 100 हून अधिक जणांची चौकशी; नातेवाईकही रडारवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या देणगी घोटाळ्या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत सुरू आहे. हा घोटाळा उघड झाल्यापासून एसआयटीने सहा दिवसात 100 हून अधिक जणांची चौकशी केली आहे. राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय, गोपाळ राव, डॉ. अनिल मिश्रा आणि रामशंकर उर्फ टिन्नू यादव यांचीही या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. एवढेच नाही तर संशयितांचे नातेवाईकही एसआयटीच्या रडारवर आहे. गेल्या सहा दिवसांपासून एसआयटीचे पथक अयोध्येत तळ ठोकून होते. आता हे पथक लखनौला परतले असून लवकरच आपला प्राथमिक अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करणार आहे.

2025 मध्ये झालेल्या महाकुंभ दरम्यान देणगीमध्ये घोटाळा झाल्याचा संशय एसआयटीला आहे. या काळात मिळालेल्या देणग्यांवर एसआयटीने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. महाकुंभ दरम्यान अयोध्येमध्ये कोट्यवधी भाविकांनी गर्दी केली होती. या काळामध्ये मंदिरातच्या देणगीत वाढ झाली की नाही हे देखील एसआयटीचे पथक तपासत आहे. तसेच मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आधी आणि नंतर आलेल्या देणग्यांच्या पॅटर्नचाही एसआयटीकडून तपास सुरू आहे.

तपासाचा एक भाग म्हणून एसआयटीने मंदिरामधील कर्मचाऱ्यांच्या भरतीशी संबंधित कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. कर्मचाऱ्यांची भरती करताना कोणते नियम पाळले गेले आणि कोणत्या आधारावर त्यांना नोकरी देण्यात आली याचा अभ्यास याद्वारे केला जाणार आहे. तसेच राम मंदिरातील देणगी घोटाळा आणि चोरीचा तपास करताना एसआयटी संशयित कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या आर्थिक स्थितीवरही नजर ठेवून आहे.

राम मंदिरातून 60 किलो चांदीसह मौल्यवान हार, पादुका चोरीला

संशयित कर्मचाऱ्यांनी चोरीचा पैसा वापरून आपल्या नातेवाईकांच्या किंवा कुटुंबीयांच्या नावावर कोणतीही मालमत्ता खरेदी केली आहे का किंवा कोणताही नवीन व्यवसाय सुरू केला आहे का, याचा शोध घेतला जात आहे. तसेच, राम मंदिर परिसरात दीर्घकाळापासून कार्यरत असणारे कर्मचारी आणि सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेले काही लोकही एसआयटीच्या रडारवर आहेत. ‘एनडीटीव्ही हिंदी‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

दागिन्यांचे मूल्यांकन करणाऱ्यांवरही संशय

भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचे मूल्यांकन कसे केले जात होते, याचीही चौकशी केली जात आहे. दागिन्यांची मूळ किंमत जास्त असताना कागदोपत्री ती कमी दाखवून पावती फाडली गेली आणि उर्वरित हिस्सा आपापसात वाटून घेतला गेला, अशी शंका एसआयटीला आहे. त्यामुळे दागिन्यांचे मूल्यांकन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही कसून चौकशी केली जात आहे.

चोर कोणीही असो, सोडणार नाही! श्रीराम मंदिर देणगी चोरीप्रकरणी योगी आदित्यनाथ यांचा इशारा