
वैभव सूर्यवंशीचा वादळी झंझावात आणि यश-विपराजच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थान ‘ए’ ने श्रीलंका ‘ए’ संघाचा पराभव करत तिरंगी मालिकेवर कब्जा केला. दांबुला स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कर्णधार तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर अप्रतिम कामगिरी केली. हिंदुस्थानने 50 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 377 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात श्रीलंका ‘ए’ चा संघ 311 धावांवर गारद झाला.
या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून हिंदुस्थानला पहिले फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाकडून युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने अवघ्या 29 चेंडूंमध्ये 94 धावांची अत्यंत स्फोटक आणि वादळी खेळी खेळली. त्याच्या या खेळीने श्रीलंकेच्या गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले आणि हिंदुस्थानच्या विजयाचा पाया रचला. वैभव व्यतिरिक्त कर्णधार टिळक वर्माने 67 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर प्रियांश आर्या आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी 39 धावांचे योगदान दिले. या सामूहिक कामगिरीच्या बळावर हिंदुस्थानला 377 धावांपर्यंत पोहोचता आले.
टीम इंडियाने दिलेल्या 378 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका ‘ए’ संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. वेगवान गोलंदाज यश ठाकूरने सुरुवातीचे दोन झटके देत श्रीलंकेची अवस्था 33 धावांवर 2 बाद अशी केली. वाढत्या धावसंख्येच्या दबावामुळे श्रीलंकेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहिले. श्रीलंकेकडून वणुजा सहानने 62 आणि सदिरा समरविक्रमाने 52 धावांची झुंज दिली, पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. टीम इंडियाकडून गोलंदाजीत यश ठाकूर आणि विप्रराज निगम यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले, तर अनुकूल रॉयने 2 विकेट्स घेतले. या दमदार विजयानंतर आता हिंदुस्थान ‘ए’ संघ 25 जूनपासून श्रीलंका ‘ए’ विरुद्ध दोन सामन्यांची अनऑफिशियल कसोटी मालिका खेळणार असून, या कसोटी मालिकेचे नेतृत्व ध्रुव जुरेलकडे असेल.























































