
रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रायमिया आणि क्रास्नोदार या प्रदेशांवर युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या हल्ल्यांमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून, २८ जण जखमी झाले आहेत. वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर क्रायमिया प्रशासनाने सर्वसामान्यांसाठी इंधनाची विक्री तात्पुरती थांबवली असून, वीजपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
युक्रेनने अलिकडच्या काळात क्रायमियावरील हल्ल्यांमध्ये मोठी वाढ केली आहे. अलीकडील हल्ल्यात क्रायमियामध्ये चौघांचा तर क्रास्नोदारमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. क्रायमियाचे गव्हर्नर सर्गेई अक्स्योनोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण क्रायमियात पेट्रोल आणि डिझेलची सर्वसामान्यांना आणि खासगी व्यवसायांना होणारी विक्री तात्पुरती रोखण्यात आली आहे. आता केवळ सुरक्षा दल, आपत्कालीन सेवा आणि महत्त्वाच्या सरकारी कामांशी संबंधित वाहनांनाच इंधन दिले जाणार आहे. ऐन पर्यटन हंगामात इंधनावर बंदी आल्याने क्रायमियामध्ये मोठे संकट उभे राहिले आहे. क्रायमिया हा रशियासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रदेश असून तिथे रशियाचा ब्लॅक सी फ्लीट (काळ्या समुद्रातील नौदल ताफा) तैनात आहे. त्यामुळेच युक्रेनकडून या भागातील पुरवठा साखळी आणि लष्करी तळांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे.
दुसरीकडे रशियाच्या क्रास्नोदार या भागातही युक्रेनने मोठा ड्रोन हल्ला केला. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, युक्रेनने एका तेल वाहतूक केंद्राला लक्ष्य केले. यामध्ये एका प्रवासी फेरीवरील व्यक्तीला जीव गमवावा लागला, तर एका मोठ्या तेल टर्मिनलला भीषण आग लागली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनीही या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने असा दावा केला आहे की, त्यांच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने रात्रीत युक्रेनचे तब्बल २३९ ड्रोन पाडले आहेत. मात्र तरीही काही ड्रोन त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले.
या ड्रोन हल्ल्यांमुळे क्रायमियातील वीज वितरण यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असून अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. याशिवाय, क्रायमिया आणि क्रास्नोदारला जोडणाऱ्या केर्च सामुद्रधुनीतील फेरी सेवा काही काळासाठी थांबवण्यात आली होती. तसेच क्रायमियाला रशियाशी जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या पुलावरील वाहतूकही ९ तासांहून अधिक काळ बंद ठेवावी लागली.
























































